"...तसंच शक्तीपीठ महामार्गाचे होणार, विरोध करु नका"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:22 IST2025-03-17T14:17:08+5:302025-03-17T14:22:54+5:30
समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्ग होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं

"...तसंच शक्तीपीठ महामार्गाचे होणार, विरोध करु नका"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं
Ajit Pawar on Shaktipeeth Mahamarg: समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्ग चर्चेत आला आहे. शक्तिपीठ महामार्गाला अनेक जिल्ह्यातून विरोध केला जात आहेत. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे या मार्गाचे काम सुरु करण्यात आलं आहे. याविरोधात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन देखील करण्यात आलं. त्यानतंर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समुद्धी महामार्गाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग होणार असल्याचे म्हटलं. विरोधकांनी विरोधाला विरोध करणं सोडून द्यावं असंही अजित पवार म्हणाले.
राज्यातील १३ जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. मात्र अनेक ठिकाणी त्याला विरोध केला जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या महामार्गाविरोधात आंदोलन उभं केलं आहे. यावरुनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला. अर्थसंकल्पवरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करु नका असंही म्हटलं.
"पुढे जाण्यासाठी कर्ज काढण्याचे धाडस दाखवावं लागतं. जर कमी टक्के व्याजाने तु्म्हाला कर्ज मिळालं आणि त्यातून तुम्ही प्रकल्प उभा केला. तो प्रकल्प १ लाख कोटींचा झाला आणि पाच वर्षांनी तो प्रकल्प दोन लाख कोटींवर जातो. अटल सेतूचे पंतप्रधान मोदींनीच भूमीपूजन केलं आणि त्यांनी उद्धाटन केलं. हा प्रकल्प पुढे करायचा असता तर किती लाख कोटींमध्ये गेला असता," असं अजित पवार म्हणाले.
"समृद्धी महामार्गाला काही लोकांनी विरोध केला. आम्हीसुद्धा त्या विरोधामध्ये होतो. आम्हाला शेतकरी म्हणायचे की आपल्याला विरोध करायचा आहे. त्यावेळी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पैसे चार पटीने पाच पट केले तेव्हा सगळे इकडून तिकडे गेले आणि पैसे घेऊन मोकळे झाले. तसंच शक्तीपीठ महामार्गाचे होणार आहे. त्यामुळे विरोध करु नका. विकास करायचं म्हटलं की तो हवेतून होत नाही. हवेतून रस्ते, शहरं होत नाहीत. हे आपल्याला जमिनीवरच करावं लागतं. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षात असला तरी विरोधाला विरोध करणं सोडून द्या. विकासाच्या बाबतीत हातात हात घालून चला. आमचं कुठं चुकत असेल तर आम्हाला दाखवा आम्ही चूक दुरुस्त करु. जो काम करतो तो चुकतो. जो कामच नसेल करत तर चुकेल कसा," असंही अजित पवार यांनी म्हटलं.