Ajit Pawar: नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे, महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे, राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत, दिवसा-ढवळ्या तलवरी, कोयते नाचवले जात आहेत, गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत, राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याची स्थिती आहे. राज्यात डबल इंजिनचं सरकार आलं, विकासाचा वेग डबल होईल, म्हणून सांगितलं गेलं. मात्र राज्याच्या विकासाचा वेग डबल होण्याऐवजी गुन्ह्यांचा वेग डबल झाला आहे, असा आरोप करुन राज्यात केवळ सत्ताधारी सुरक्षित आहेत, सरकारकडून कणखर भूमिका न घेता केवळ सत्ता टिकविण्यासाठी तडजोडी सुरु आहेत, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार नियम 292 अन्वये विरोधी पक्षाच्यावतीने दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कोलमडली आहे. दिवसाढवळ्या गुंड गोळ्या घालून लोकांच्या हत्या करत आहेत. तलवारी, कोयते नाचवत रस्त्यावर फिरुन दहशत निर्माण करत आहेत. खून, दरोडे, अपहरण, हत्या, घरफोड्यांनी राज्यातले नागरीक हवालदिल झाले आहेत. जुगार, मटका, गुटखा, डान्स बार हे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींवर, महिला आमदारांवर हल्ले सुरु आहेत. धार्मिक वाद निर्माण करुन सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात पुन्हा गँगस्टरनी डोके वर काढले आहे. व्यावसायिकांच्या हत्या होत आहेत. सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली जात आहेत.
कायदा-सुव्यवस्थेवर टीका
पुण्यात कोयता गँगचा अजूनही पुरता बंदोबस्त झालेला नाही. कोयता गँगची दहशत वाढली आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुध्दा कोयता गँगने हातपाय पसरलेले आहेत. मुंबईतल्या नाहूरमध्ये दिवसा राजरोस तलवारी नाचवत गुंड फिरतात, हल्ले करतात. विशेष पोलीस आयुक्तांचं नवीन पद मिळाल्याने मुंबईतली गुंडगिरी कमी होईल, असं वाटलं होतं. उलट, आता तलवारी घेऊन, दिवसा राजरोस गुंड फिरत आहेत. सर्वसामान्यांना सुरक्षित वाटेल, व्यवसायिक आपले व्यवसाय करु शकतील, अशी परिस्थिती आज मुंबईत आहे का ? काही गुंडांना नुसती अटक करुन उपयोग नाही. याची पाळंमुळं खणून काढण्याची गरज आहे. सरकारने कोणालाही पाठीशी घालू नये.