अजित पवारांनी सरकार स्थापनेसाठी सोबत यावे; राधाकृष्ण विखे यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 06:13 AM2022-06-14T06:13:31+5:302022-06-14T06:13:55+5:30
तेव्हापासून पुन्हा हातात घड्याळ घेतले नाही. हा माझा निर्णय योग्यच ठरला, अशी मिश्कील टिप्पणी करीत पवार आणि विखे कुटुंबात कोणताही संघर्ष नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले.
लोणी (जि. अहमदनगर) :
१९७५ साली मॅट्रिकला असताना माझ्याकडे घड्याळ नव्हते. वडिलांनी पेपरला जाताना त्यांच्या हातातील घड्याळ काढून मला दिले. परीक्षा संपल्यावर मी हातातील घड्याळ पुन्हा वडिलांना दिले. तेव्हापासून पुन्हा हातात घड्याळ घेतले नाही. हा माझा निर्णय योग्यच ठरला, अशी मिश्कील टिप्पणी करीत पवार आणि विखे कुटुंबात कोणताही संघर्ष नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले.
विविध समाजघटकांच्या हितासाठी अजित पवार यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे. देवेंद्रजींनी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करावे, अशी सादही विखे यांनी पवारांना घातली. १५ जूनला माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे वयाची ६५ वर्षे पूर्ण करीत आहे. या पार्श्वभूमीवर लोणी (ता. राहाता) सोमवारी आयोजित कार्यक्रमात विखे बोलत होते. त्यांची अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना, विरोधी पक्षनेते होण्यापेक्षा मला मंत्री व्हायला आवडेल असे विखे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकर सरकार आणावे. उद्धव ठाकरे मितभाषी, संयमी आहेत, पण त्यांनी चुकीचे लोक दूर केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
पवार शिस्तप्रिय
अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत लवकर येण्याचा निर्णय घ्यावा. बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचे नाही आणि कोणता सल्लाही द्यायचा नाही. मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांची चर्चा होत असते. पण चर्चेत नसलेले अनेकजण मुख्यमंत्री झाले आहेत, असेही विखे म्हणाले.