मुंबई - अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मी आषाढी एकादशीला पांडुरंगाकडे साकडे घातले होते. अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात त्यानंतरच्या घडामोडी मी आता सांगू शकत नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व अजित पवारांनी करावे ही जनतेची इच्छा आहे असं सांगत राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, ज्या ३५ आमदारांनी अजित पवारांना समर्थन दिले. त्यांनी स्वखुशीने दिले आहे. कुणाच्या दबावाखाली सह्या केल्या नाही. आणखी आमदार अजित पवारांसोबत येतील. मी राष्ट्रवादीसोबत आहेत, पक्ष एकसंघ आहे. संजय राऊतांनी अजित पवार मुख्यमंत्री बनतील असं विधान केले त्यांच्या तोंडात साखर पडो. ही जनतेची इच्छा आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटलेला नाही. शरद पवारच आमचे नेते आहेत. दादा म्हणजे राष्ट्रवादी, शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी असं विधान त्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतल्यानंतर केले.
तसेच शरद पवार आमचे गुरु, त्यांनी आम्हाला राजकीय ओळख दिली. शरद पवार हे भीष्मपीतामह आहेत. मी गुरुपोर्णिमेनिमित्त अजित पवारांची भेट घेतली. सर्व पक्ष दादांसोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आहेत. आमच्या पक्षात इतर पक्षासारखी फूट नाही. आमचा पक्ष फुटीर नाही. काल रात्री जी पत्रकार परिषद झाली. ती पत्रकार परिषद मी पाहिली नाही. अधिकृत प्रतोद कोण हे माहिती नाही. मी शरद पवारांनाही भेटणार आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान कार्यकर्ते फार उतावीळ असतात. पक्षाच्या कुठल्याही नेत्याचा अपमान कार्यकर्त्यांनी करू नये. भावनेच्या भरात काहीतरी चुकीचे करतात. त्यानंतर आपण चूक केली हे लक्षात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आरएसएस विरोधी होते. परंतु त्यांचे काँग्रेससोबत आघाडी झाली नव्हती. शामाप्रसाद मुखर्जी ज्या मंत्रिमंडळात होते त्यात डॉ. आंबेडकरही होते. आरएसएससोबत लढाई थांबवली नव्हते. भाजपाचे हिंदुत्व हे बेगडी आहे. आम्ही आमच्या तत्वाशी तडजोड करत नाही. जिथं चुकीची भूमिका असेल तिथे बोलणारच. अजित पवारांची प्रशासनावर पकड होती. ती महाराष्ट्राची गरज होती. तो निर्णय आज झालेला आहे असं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.