Ajit Pawar News: वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कानउघाडणी केली. काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले की, अजित पवारांनी वादग्रस्त विधानावरून कोकाटेंना झापले. याबद्दल बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अजित पवारांना सल्ला दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलताना एक विधान केले होते, ज्यावरून शेतकरी आणि विरोधकांनी संताप व्यक्त केला. विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत असून, देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी वादग्रस्त विधानांबद्दल नाराजी व्यक्त केली.
वाचा >>१९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी केलेलं काम अन् मी केलेलं काम पाहा
राजू शेट्टी म्हणाले, आतातरी शहाणपणाणं वागावं
"हे अजित पवारांनी ज्यावेळी त्या माणिकरावांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर केली, त्यावेळीच करायला पाहिजे होतं. असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं. कशासाठी घेतलं मला माहिती नाही. परंतु आतातरी त्या कृषिमंत्र्यांनी शहाणपणाने वागावं, अन्यथा शेतकरी काही आता गप्प बसणार नाही", असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
शक्तिपीठ महामार्गात ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार -शेट्टी
"शक्तिपीठ महामार्गासाठी जो अवास्तव खर्च दाखवलेला आहे, म्हणजे यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो खर्च यांनी ८६ हजार कोटी रुपये दाखवला आहे. म्हणजे २८ हजार कोटीत होणारा हा रस्ता ८६ हजार कोटी करून ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार यात होणार आहे", असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे.
"विकासाला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्यांची थडगी बनवून त्यावर विकास करणार असाल, तर होऊ देणार नाही. कारण ५५ हजार शेतकरी शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणार आहेत", असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.