हिंमत असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा; जितेंद्र आव्हाडांचा जोरदार घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 01:14 PM2024-06-26T13:14:41+5:302024-06-26T13:15:43+5:30
नीट पेपर लीक प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुंबई - नीट परीक्षेच्या घोटाळ्याबाबत नालायक सरकारला काही देणंघेणं नाही. अजित पवार हे नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत परंतु भेट कसली घेता, हिंमत असेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी करत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर घणाघात केला आहे.
नीट परीक्षेतील गोंधळावर पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की, विद्यार्थ्यांची भेट घेणार असं अजित पवार सांगतात, पण भेट कसली घेता, तुम्ही ज्या सरकारमध्ये सहभागी आहात. तुमच्याच मित्रपक्षाचे मंत्री ज्यांच्या विभागात हा घोटाळा झाला तिथे आहेत. पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. भेट कशाला घेता. राजीनामा मागा नाहीतर मला हे पटत नाही म्हणून तुम्ही राजीनामा द्या. पोरांच्या आयुष्याशी खेळू नका. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि केंद्रातील सरकारला वठणीवर आणा अशी मागणी त्यांनी केली.
तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीला तुम्ही देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या परीक्षेचं काम देता. हेच MBBS चे विद्यार्थी पुढे जाऊन न्यूरोलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट बनतील. याचा अर्थ आपलं शरीर त्यांच्या हाती आहे. ते पुढे जाऊन काम काय करणार? ५, १० कोटी देऊन जर अशिक्षित डॉक्टर बनत असेल तर पोटाचं ऑपरेशन करायला सांगितले तर ते छातीचे ऑपरेशन करतील. ही मस्करी आहे का? देशातील जनतेशी खेळण्याचा हा प्रकार आहे असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.
दरम्यान, सरकारने प्रायश्चित घ्यायला हवं, मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. इतक्या महत्त्वाच्या परीक्षेची जबाबदारी एखाद्या खासगी संस्थेला कशी देता? लाखो, कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा हा संबंध आहे. पेपरफुटीची कामे महाराष्ट्रात नेहमी होतायेत. त्यामुळे हे पेपर आता अमेरिकेत प्रिंट करा आणि विमानाने १ तास आधी घेऊन या, मग वाटा कारण आपल्या इथून कुठेही पेपर लीक होतात असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.