महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापनेपासून आजपर्यंत राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवता आलेले नाही. शरद पवारांसारखं दिग्गज नेतृत्व मिळूनही आलेल्या या अपयशावरून विरोधक राष्ट्रवादीला डिवचत असतात. दरम्यान, २००४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तेव्हा हातातोंडाशी आलेली मुख्यमंत्रिपदाची संधी पक्षाने दवडली होती. दरम्यान, २००४ साली मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडणं ही सर्वात मोठी चूक होती. कुणालाही मुख्यमंत्री केलं असतं तरी चाललं असतं, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केले आहे.
अजित पवार यांना कुठल्या चुका झाल्या नसत्या तर बरं झालं असतं असं वाटतं, असं विचारला असता अजितदादा म्हणाले की, ते सांगण्यात आता अर्थ नाही. एक मात्र मोठी चूक वाटते ती म्हणजे २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडायला नको होतं. मी खोटं सांगत नाही. आर आर पाटील, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचं होतं. किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात कोण होते त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं. पण २००४ ला जर मुख्यमंत्रिपद जर राष्ट्रवादीकडे आलं असतं तर ते शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावेळी २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा अधिक होत्या, तरी मुख्यमंत्रिपद न घेण्याचा निर्णय कुणी घेतला हा प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले की, आम्ही तेव्हा ज्युनियर होतो. निर्णय प्रक्रियेमध्ये बोलणारे कोण होते तर प्रफुल्ल पटेल, मधुकर पिचड, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे आमचे नेतेगण होते. त्यांनी सांगायचं आणि आम्ही जी म्हणायचं, अशी परिस्थिती होती, असं विधान अजित पवार यांनी केलं.
यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी नशिबाची साथ आवश्यक असल्याचेही अजितदादा म्हणाले, आपण कितीही काही म्हटलं तरी प्रयत्न करणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. पण कुठेतरी नशिबाची पण साथ लागते. सगळ्याच क्षेत्रात ती लागते. देशातही पंतप्रधानपदाच्या योग्यतेची अनेक माणसं होती, पण सगळ्यांनाच ते पद मिळतं का. अगदी महापौरपद असेल, मुख्यमंत्रिपद असेल, किंवा आणखी कुठली पदं असतील. सगळ्याच ठिकाणी असं होतं. असं त्यांनी सांगितलं.
यावेळी २००४ ची संधी २०२४ मध्ये आली तर काय कराल, असे विचारले तेव्हा अजित पवार म्हणाले की, आत्याबाईला मिशा असत्या तर काय झालं असतं तसं मी सांगेन. झाल्यावर दाखवतो काय करेन ते, असे गमतीदार उत्तर अजित पवार यांनी दिले.