अजित पवार आजारी, मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय; त्यांच्याविरोधातील आंदोलन रद्द केले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 08:05 AM2023-11-02T08:05:20+5:302023-11-02T08:05:53+5:30
अजित पवार यांच्या हस्ते बारातमतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज आहेत. अजित पवारांना डेंग्यू झाल्यावरून देखील मराठा समाजाकडून टीका होत आहे. अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाल्याचेही आरोप होत आहेत. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून बाहेर पडलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने अजित पवारांविरोधातील आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांच्या हस्ते आज दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ होणार होता. या समारंभास दौंड शहर व तालुका सकल मराठा समाजाने विरोध दर्शविला होता. परंतू, अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याने आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेण्य़ात आला आहे. आता अजित पवारांऐवजी गळीत हंगामाचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार यांच्या हस्ते बारातमतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथेही याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना निवेदन देण्यात आले होते. या वर्षीचा गळीत हंगाम कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्ते करू नये. राजकीय व्यक्तींच्या हस्ते गळीत हंगाम सुरू करण्याचा घाट घातल्यास कारखान्यावर बहुसंख्येने येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला होता. परंतू, तिथेही अजित पवार गेले नव्हते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत खालावली असल्याची महत्त्वाची माहिती मंगळवारी समोर आली होती. अजित पवारांवर उपचार करणारे डॉ. संजय कपोटे यांनी त्यांना वेळ पडल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल असे म्हटले होते. गेल्या ४-५ दिवसांपासून अजित पवारांना डेंग्यू झाला आहे. NS1 पॉझिटिव्ह असल्याने त्यांना आजही १०१ से. ताप आहे. अजित पवारांच्या प्लेट्सरेट दिवसेंदिवस कमी होत आहेत. आधी १ लाख ६० हजार होते, आता मंगळवारी रात्री ते ८० हजारांवर आलेत. शरीरातील पांढऱ्या पेशीही कमी झाल्या आहेत. बुधवारी म्हणजे आज अजित पवारांची वैद्यकीय चाचणी करून त्यात काही विशेष आढळले तर अजित पवारांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले होते.