Ajit Pawar Abdul Sattar: हल्लीच्या राजकारणात वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत, त्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात, पहात असतात, लक्षात ठेवत असतात. आपल्या विधानानंतर काही जण म्हणतात की मी सहज बोललो... तुम्ही सहज बोलायला सामान्य नागरीक आहात का? ... तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे. तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे. त्याची आठवण ठेवून बोला, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तारांसह साऱ्या राजकीय वाचाळवीरांना खडसावले.
"मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहीण सुप्रिया सुळे हिला काही बोलले. विनाशकाले विपरीत बुद्धी हेच त्यांना बोलले पाहिजे. आपण काय बोलतो, मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का, मंत्रीपदे येतात आणि जातात... कोण आजी... कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत. संविधान, कायदा, नियम याचा सर्वांनी आदर करायला हवा, पण यामध्ये हे चुकत आहेत. त्यामुळे त्यांना जपून बोलण्याची ताकीद द्यायला हवी," असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
"पोलीस आणि सचिवांनी आपली भूमिका कणखर मांडली पाहिजे. भारतात आपल्या राज्याचा नावलौकिक आहे, तो ढासळू देता कामा नये. जी परंपरा महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली आहे, ती घडी विस्कटू न देता सत्ताधारी पक्षाचे लोक, मंत्रीमंडळातील लोक चुकत असतील तर त्यांना स्पष्ट सांगितले पाहिजे. या वाचाळवीरांना आवरा. त्यांना ताबडतोब सूचना द्या. महाराष्ट्राची जी परंपरा त्याला गालबोट लावू देऊ नका. महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु आज विदारक चित्र पाहायला मिळत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे," असंही मत अजित पवार यांनी अत्यंत पोटतिडकीने व्यक्त केले.