Ajit Pawar, Farmer Caste Case for fertilizer: रासायनिक खतांच्या खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना आपली जात (Farmer Cast For Fertilizer) सांगावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीमध्ये खत खरेदीसाठी ई-पॉसमधील (Fertilizer E-Pos) सॉफ्टवेअरमध्ये खरेदीदार शेतकऱ्यांच्या जातीची विचारणा केली जात आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी (Fertilizer Subsidy) जातीची माहिती कशासाठी, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. राज्यात आधीच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता रासायनिक खतांच्या खेरदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगावी लागत आहे. सरकारच्या या निर्णयावर अजित पवारांनी आक्रमक होत, सभागृहात सरकारला सुनावले.
"अहो शेतकरी आमची जात आहे... खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय," असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगलीचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व सरकार जातीवाद निर्माण करू पाहतंय का? असा सवाल केला. "रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे. ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये," असे अजित पवारांनी सरकारला खडसावले.
"या प्रकरणात कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरु नये. कोण यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जातीचे लेबल बंद करावे व याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे," अशी मागणी अजित पवार यांनी केली.
राऊतांचाही सरकारला इशारा
"महाराष्ट्रातील आणि देशातील सरकारने जात आणि धर्म यांच्या आधारावर राजकारण सुरू केले आहे. शेतकऱ्यांना जात विचारली जात असून त्यानंतर मदत दिली जात असल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पण जर प्रत्येक ठिकाणी 'जात दाखवण्याचं' काम राज्य सरकार करत असेल तर मग शेवटी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला त्यांचा 'महाराष्ट्रधर्म' दाखवावा लागेल", अशा शब्दांत राऊतांनी इशारा दिला.