एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून राज्यात दररोज ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 04:20 PM2022-08-18T16:20:50+5:302022-08-18T16:21:24+5:30
पावसाळी अधिवेशनात अजितदादांनी शिंदे-फडणवीस सरकारचा घेतला खरपूस समाचार
Ajit Pawar vs Eknath Shinde: राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer's Suicides) केल्या आहेत, अशी आकडेवारी जाहीर करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर तोफ डागली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? शेतकऱ्यांना हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. राज्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती यामुळे शेतकरी अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीच्या प्रस्तावावर ते अधिवेशनात बोलत होते.
मागच्या महिन्यात अतिवृष्टी भागाचा दौरा केल्यानंतर ज्या गोष्टी निदर्शनास आल्या, त्याबद्दल सभागृहात माहिती देऊन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले पाहिजे. तसेच इतरही कृषीमधील तज्ज्ञ लोकांना भेटावे आणि उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागले तरी काढा. पंतप्रधानांना भेटा, अर्थमंत्र्यांना भेटा, काहीही करा पण शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत करावी अशी मागणीही अजित पवार यांनी पुन्हा एकदा केली. याशिवाय, राज्यात मागच्या दोन महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. अजूनही पाऊस पडत आहे. राज्यातली सर्व धरणे भरलेली आहेत. हवामान खात्याने यापुढेही पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर मोठा पाऊस झाला तर धरणातील पाणी ओव्हरफ्लो होऊन नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाऊस संपेपर्यंत पाटबंधारे खात्याचा अधिकारी रात्रीच्या वेळी धरणावर असला पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. धरणातून पाणी सोडण्यात थोडी जरी चूक झाली तर त्याचा फटका खालच्या बाजूच्या लोकांना भोगावा लागू शकतो, याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधले.