केंद्रात, राज्यात सत्ता आहे मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय? मुहुर्त बघताय का? असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. अजूनही खूप मोठ्या व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत त्यांना भारतरत्न मिळायचा बाकी आहे. त्यात सावरकर आहेत. गौरवयात्रा काढता मग कोश्यारी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व इतर महापुरुषांबद्दल भाजपाचे मंत्री, प्रवक्ते आमदार यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली. त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आले नाही? त्या महापुरुषांबद्दल का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत? हे निव्वळ राजकारण आहे अशा शब्दांत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नपुसंक सरकार असे सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले आहे ते मीडियात ऐकले आणि वर्तमानपत्रात वाचले. सुप्रीम कोर्टाने कोणत्या शब्दाचा वापर करावा तो त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल मला कोणतेही वक्तव्य करायचे नाही. परंतु आम्ही राजकीय पक्ष म्हणून काम करतो. सरकारमध्ये कुणीही असले तरी ते महाराष्ट्राच्या साडेतेरा कोटी जनतेचे सरकार असते. तसे देशाचे पंतप्रधान एकशे पस्तीस कोटी जनतेचे असतात. त्यामुळे बाहेर गेल्यावर आपल्या पंतप्रधानांबद्दल मी आदरानेच बोलत असतो हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
"नरेंद्र मोदी यांची 2014 ला डिग्री बघून लोकांनी निवडून दिले का? त्यांनी देशात स्वतः चा करिष्मा निर्माण केला. जो भाजपाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता असा टोला लगावतानाच याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. डिग्रीवर काय आहे आतापर्यंत सुरुवातीपासून देशाचे पंतप्रधान झाले, अनेक मुख्यमंत्री झाले. आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करून निवडून येणाऱ्याला महत्त्व आहे. बहुमत असेल तो प्रमुख होतो. त्यामुळे शिक्षणाच्याबाबतीत वैद्यकीय क्षेत्रात पदवी झाल्याशिवाय काम करु शकत नाही. असे राजकारणात नाही त्यामुळे ते आज 9 वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत आणि आता डिग्रीचे काढले जाते हा महत्त्वाचा प्रश्न नाही."
"सध्या महत्त्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे. गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी वाढली आहे त्याबद्दल बोलायचं नाही चर्चा करायची नाही. नोकरी कधी मिळणार या आशेवर तरुण आहेत. ७५ हजाराची वेगवेगळ्या खात्यात भरती होणार होती. त्याचे काय झाले . शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगार, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते आपण सोडून देतो त्यामुळे डिग्री या विषयाला फार महत्व द्यावे" असे मला वाटत नाही असेही अजित पवार म्हणाले.
आपण देशाला का मागे मागे नेतोय हेच कळेना... अभ्यासक्रमातून देशाचा इतिहास काढला तरी त्या इतिहासाची इतिहासात कायमची नोंद राहणार आहे ना. जो इतिहास आहे त्याला घाबरायचं काय... आहे तो आहे. कुठल्या विचारसरणीत आपण जगतो, राहतो आणि काय करतो मला कळायला मार्ग नाही. या विषयातून महागाई, बेरोजगारी कमी होणार आहे का? असा सवालही अजित पवार यांनी केला.