Ajit Pawar, NCP: निर्णयाची वाट बघत बसू नका, तयारीला लागा; अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 05:35 PM2022-11-04T17:35:35+5:302022-11-04T17:36:04+5:30
"रेटून बोल पण खोटं बोल' हा सध्याच्या सरकारचा धंदा"
Ajit Pawar, NCP: "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले कार्यकर्तेच पक्षाला ताकद देतात. त्यातून आमदार, खासदार तयार होतात. हेच लोक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची वाट सोपी करणारे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या विचारांची माणसे निवडून आणावी. पक्षाकडून निर्णय येईल याची वाट बघत बसू नका. निर्णय येईल तेव्हा येईल, तोपर्यंत स्वतंत्र लढायचं आहे. त्यादृष्टीने कामाला लागा", असे सूचक सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरात स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी शिंदे सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला.
@NCPspeaks चे 'राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा' या शिबिराचे शिर्डी येथे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. प्रफुल पटेल, माजी मंत्री मा. छगन भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. pic.twitter.com/ScVZgJBTjX
— NCP (@NCPspeaks) November 4, 2022
"लोकशाही व्यवस्थेला नख लावण्याचे काम होते आहे. परंतु ते कधीही यशस्वी होणार नाही. सर्व निवडणुका वेळेत होणे आवश्यक आहे परंतु निवडणुकांना विलंब केला जात आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. निवडणूका वेळेत होणे याकडे राज्य निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. त्यांची ती जबाबदारी आहे. 'राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा' हे ब्रीद वाक्य घेऊन आपण हे शिबीर करत आहोत. येणाऱ्या भविष्यात पक्षाने काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे, कोणत्या पध्दतीने काम केले पाहिजे. पक्षाची पुढची वाटचाल ठरवण्यासाठी हे शिबीर आहे," असे मार्गदर्शन अजित पवार यांनी सांगितले.
'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या शिबिराच्या सुरुवातीलाच @NCPspeaks चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks साहेबांची क्षणभराची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अचानक झालेली भेट संपूर्ण कार्यक्रमाला व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन गेली. pic.twitter.com/QAZzQwAgs6
— NCP (@NCPspeaks) November 4, 2022
"रेटून बोल पण खोटं बोल' हा सरकारचा धंदा"
"सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. फेब्रुवारी २०२३ मध्ये पाच निवडणूका होत आहेत. याबाबत सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन चर्चा करण्यात आली आहे. या निवडणूका आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत. या पाचही जागा आघाडीच्या कशा येतील त्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले आहेत त्यातून लाखो नोकर्या तरुणांना गमवाव्या लागल्या आहेत. मात्र सरकार याचे लंगडे समर्थन करताना दिसत आहे. चार लाख कोटी एवढी गुंतवणूक राज्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र आता महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प गेला हे धांदात खोटं बोलत आहेत. अंगलट आल्यावर दिल्लीला जातो आणि प्रकल्प घेऊन येतो सांगत आहेत. मात्र यांच्यामुळेच बेकारी वाढत आहे. नोकर्यांवर गंडांतर येत आहे. हे सरकार जनतेची पूर्णपणे फसवणूक करत आहेत. 'रेटून बोल पण खोटं बोल' हा धंदा सध्या सरकारचा सुरू आहे," अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली.