Ajit Pawar: "महाराष्ट्रामध्ये लवकरच अजितपर्व", अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचं सूचक ट्विट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 09:12 AM2023-07-22T09:12:40+5:302023-07-22T10:06:10+5:30
Ajit Pawar Birthday: आज अजित पवार यांचा वाढदिवस असताना त्यांचे खंदे समर्थक असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रामध्ये लवकरच अजित पर्व सुरू होईल, असं ट्विट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या चार वर्षांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी समर्थक नेते आणि आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच २ जून रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, आज अजित पवार यांचा वाढदिवस असताना त्यांचे खंदे समर्थक असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रामध्ये लवकरच अजित पर्व सुरू होईल, असं ट्विट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार अमोल मिटकरी यांनी हे खास ट्विट केलं आहे. ‘’मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व’’ अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलंय. मिटकरी यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्वpic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून, पक्षाचे अनेक विद्यमान आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्याकडे वित्तमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र पुढच्या काळात एकनाथ शिंदे यांना हटवून अजित पवार यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद दिलं जाईल, असा दावा संजय राऊतांसह महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मिटकरी यांनी केलेलं ट्विट हे त्याचेच संकेत तर नाहीत ना, असा अंदाज वर्तवला आहे.