मुख्यमंत्रीपदाचा चार्ज कोणाला द्यायचा?; अजित पवार स्पष्टच बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 12:56 PM2021-12-29T12:56:37+5:302021-12-29T12:59:35+5:30
CM Uddhav Thackeray, Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा विषयही हिवाळी अधिवेशनादरम्यान गाजला होता.
राज्याच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. यामध्ये आमदार नितेश राणे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा विषयही गाजला होता. दरम्यान, अजित पवार यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी सोपवायला हवी होती, असंही विरोधकांनी म्हटलं होतं. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील यावरुन टोला लगावला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या शैलीत यावर टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीतच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. मंगळवारी विधीमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं. यानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांवर आपल्या शैलीत उत्तर दिलं. "अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात येऊन पाहणी केली होती. तसंच विधीमंडळातील प्रत्येक विषयात ते मार्गदर्शनही करत होते. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ते येणार होते, परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना न येण्याची विनंती केली," असं ते म्हणाले. "आमच्यात चार्ज कोणी द्यायचा आणि कोणी घ्यायचा ते आम्ही ठरवू. बाहेरच्यांनी उगाच त्यात नाक खुपसायचं काय कारण," असंही ते म्हणाले.
काय म्हणाले होते पाटील?
"मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणे साहजिक आहे. पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असे स्वाभाविक आहे. कारण पदभार घेतला तर सोडणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे," असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नसावेत, असा प्रश्न विचारला असता, त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. तसेच रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.