छगन भुजबळांच्या नाराजीनाट्यावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 23:24 IST2024-12-22T23:23:16+5:302024-12-22T23:24:45+5:30

बारामती इथं आयोजित सत्कार समारंभात अजित पवार यांनी पहिल्यांदाच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Ajit Pawar spoke for the first time about Chhagan Bhujbal minister post | छगन भुजबळांच्या नाराजीनाट्यावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

छगन भुजबळांच्या नाराजीनाट्यावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

Ajit Pawar Speech ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने आल्यानंतर त्यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र अजित पवार यांनी या सर्व प्रकरणावर मौन बाळगणं पसंत केलं होतं. अखेर बारामती इथं रविवारी आयोजित सत्कार समारंभात त्यांनी पहिल्यांदाच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार म्हणाले की, "मंत्रिमंडळात काही मान्यवरांना थांबायला सांगितले, तर काहींनी रोष व्यक्त केला. वास्तविक कधी कधी नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते. इथं संधी न देता केंद्रात संधी देण्याचा आपण विचार केलेला आहे. त्यांना योग्य मानसन्मान दिला पाहिजे, तो देण्यासाठी अजित पवार तसूभर देखील कमी पडणार नाही. पण याबाबत गैरसमज करुन वेगळी भूमिका घेणे बरोबर नाही. राज्यात कोणावरही अन्याय केला जाणार नाही," असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर केले.

भुजबळांच्या गच्छंतीची अन्य कारणे कोणती?

छगन भुजबळ यांच्या नाराजी नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोजके नेते उघडपणे बोलले. त्यातही सामंजस्याचा सूर होता. पण अजित पवार यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नव्हते. सुरुवातीच्या काळात नॉट रिचेबल होत त्यांनी हे प्रकरण शांत होऊ दिले. भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीपासून कसा अन्याय झाला, याची कहाणी सांगितली. पण पक्षाची बाजू अद्याप समोर आलेली नव्हती.  काही दुवे जोडण्याचा प्रयत्न केल्यास थोडेफार चित्र समोर येऊ शकते. विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे तीन टप्प्यात नाशिकमधील पक्षाच्या सहा उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारासाठी चारासाठी आले होते. त्यांनी येवल्यात सभा घेतली नव्हती. भुजबळ यांनीही केवळ हिरामण खोसकर यांचा अर्ज दाखल करतेवेळी उपस्थिती लावली, अन्य उमेदवारांच्यावेळी ते नव्हते. विदर्भातील एका मतदारसंघाचा अपवाद वगळता ते राज्यात व जिल्ह्यात कोठेही पक्ष वा महायुतीच्या प्रचारासाठी गेले नाहीत. याचा अर्थ पक्षश्रेष्ठी आणि भुजबळ यांच्यात समीर भुजबळ यांचा राजीनामा आणि बंडखोरी या घटनेपासून दुरावा निर्माण होत होता काय? अन्य काही कारण होते? मंत्रिमंडळातून डावलणे हा त्याचा परिपाक आहे काय? अशी चर्चा रंगत आहे.

दुसरीकडे, मंत्रिमंडळात समावेश होत नसल्याचे लक्षात येताच भुजबळ यांनी विस्तार कार्यक्रम, हिवाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवत नाशिक गाठले. नाशिक, येवल्यात त्यांनी समर्थकांशी चर्चा केली आणि समता परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्षनेते अजित पवार यांच्यावर त्यांचा सर्वाधिक रोष दिसून आला. त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुकूल होते, असे म्हणत त्यांच्याशी व पर्यायाने भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काँग्रेसने त्यांना उघड आवतण धाडले. त्यामुळे भुजबळ आता काय पवित्रा घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

Web Title: Ajit Pawar spoke for the first time about Chhagan Bhujbal minister post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.