"घोटाळा शब्दालाही वाटलं असेल आपलाच काहीतरी 'घोटाळा' झालाय", अजित पवारांच्या विधानानं हशा पिकला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 05:25 PM2022-03-25T17:25:37+5:302022-03-25T17:25:37+5:30
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेत संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
मुंबई-
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेत संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच अजित पवारांनी आपल्या हटके शैलीत मिश्किलपणे विरोधकांना टोला लगावला. यावेळी अजित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर भाष्य केलं. "राज्याचे विरोधी पक्षनेते काल नुसतं घोटाळा, घोटाळा तर होते. अधिवेशन सुरू झाल्यापासून नुसतं घोटाळा, घोटाळा सुरू आहे. आम्ही इथं काय घोटाळेच करायला बसलोय का? यांनी इतक्या वेळा घोटाळा, घोटाळा म्हटलंय की घोटाळा शब्दालाही वाटलं असेल अरे आपलाच काहीतरी घोटाळा झालाय", असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला. त्यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला. सत्ताधारी आमदारांनी बाक वाजवून अजित पवारांच्या विधानाला दाद दिली.
मद्यराष्ट्र आणि मद्य विक्री आघाडी अशा विरोधकांकडून केल्या गेलेल्या टीकेला अजित पवार यांनी जशास तसं उत्तर दिलं. यावेळी फडणवीसांनी मध्यप्रदेशातील दारू आणि वाईन विक्री संदर्भातील आकडेवारीच सर्वांसमोर मांडली. उत्पन्न वाढवण्यासाठी काही गोष्टी केल्या पण वाईट गोष्टी घडणार असतील तर निर्णय लागू होणार नाही, असं अजित पवार म्हणाले. "आपला महाराष्ट्र साधुसंतांचा आहे. त्यामुळे राज्याला असं मद्यराष्ट्र आणि दारुला प्रोत्साहन देणारं सरकार म्हणून हिणवू नये. चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्यासाठी नेत्यांनीच मागणी केली होती. सुपरमार्केटमध्ये सध्या अंडी, मटण विक्रीस ठेवलेलं असतं तिथं शाकाहारी माणूस जात नाही. जनतेला ते नको असेल तर ते आम्ही लादणार नाही", असं अजित पवार म्हणाले.
विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांनी 32 वर्ष मुख्यमंत्रिपद भूषवलं : अजित पवार
"आम्ही सरकारमध्ये असलो की विदर्भाचे विरोधक आहोत अशी भावना तयार करायचं काम होतं आहे. पण हे काही बरोबर नाही. आम्ही पण सरकारमध्ये काम करतो. कोणीही संपूर्ण राज्याचा मंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत असतो. फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा ते काही फक्त विदर्भाचे मुख्यमंत्री नव्हते. जयंत पाटील अर्थमंत्री असताना नाथसागरपासून गोदावरी वर बॅरेज बांधण्याचं काम केलं. मराठवाडा ग्रीडला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. इस्त्राईल सारख्या देशात चार इंच पाऊस पडतो, पाईपलाईन द्वारे लांबवर पाणी नेलं. मागच्या सरकारमध्ये मराठवाडा ग्रीड संदर्भात काम झालं. आम्ही टप्प्या टप्प्यानं पुढं जाणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांनी 32 वर्ष मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही", असं अजित पवार म्हणाले.