मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील सत्तेत आल्यापासून भाजपाकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात येत आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लवकरच पडेल, असे भाकित सुद्धा भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
राज्यात ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा असेल, ती व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते, हे लोकशाहीतील सत्य आहे. हे सरकार आल्यापासून कुणी म्हटले 3 महिन्यात जाईल, 6 महिन्यात जाईल, 9 महिन्यात जाईल, 12 महिन्यात जाईल, असे करत करत आता अडीच वर्ष झाले. आता त्यांना जर काही माहिती असेल, तर मला त्याबद्दल काही माहिती नाही, असे म्हणत अजित पवारांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. याचबरोबर, सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांचा जोपर्यंत महाविकास आघाडीला पाठिंबा आहे, तोपर्यंत हे महाविकास आघाडीचे सरकार चालत राहील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची 1 मे रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेबाबत बोलताना काहीजण नवीन प्रश्न निर्माण करत असतात, असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कुणी काय सभा घ्यावी, कशी घ्यावी, त्याला परवानगी त्या त्या भागातल्या पोलिसांकडून दिली जात असते. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान भारत एकसंघ ठेवण्यासाठी दिले आहे. त्यामुळेच आपण गेली 75 वर्ष देशाला पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे. पण काहीजण कधीकधी त्यातून नवीन प्रश्न निर्माण करतात. त्यात कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. ती तशी होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सतर्क आहे, असे अजित पवार म्हणाले.