"अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, माहीत नाही, पण...", अजित पवारांचा भाजपवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 02:28 PM2022-05-26T14:28:41+5:302022-05-26T16:24:56+5:30
Ajit Pawar : केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ, नये हीच माफक अपेक्षा आहे, असे म्हणत अजित पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईनंतर केंद्राच्या यंत्रणांना आणि राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार आहे. मात्र काही नेते जे बोलतात तेच घडतंय, त्यानुसार संबंधित नेत्यावर कारवाई होते, असा आरोप अजित पवार यांनी भाजप व केंद्रीय तपास यंत्रणांवर केला आहे.
गुरुवारी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अनिल परब यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत अजित पवार म्हणाले, केंद्राच्या यंत्रणांना छापेमारी करण्याचा अधिकार आहे, मागे काहींनी कोणावर कारवाई होणार यावर सुतोवाच केला होता. आणि त्याप्रकारे कारवाई होते, अशाप्रकारे कोणाचा हस्तक्षेप नसावा. मात्र काहीजण आधीच टीम कुठे जाणार, हे सांगतात. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ, नये हीच माफक अपेक्षा आहे, असे म्हणत अजित पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
केंद्रीय यंत्रणांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर सुरू आहे. यंत्रणानी त्यांच्या अधिकारांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, माहित नाही. राजकीय सुडापोटी कारवाई नको. यंत्रणांच्या कामात पारदर्शीपणा पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. याचबरोबर, अजित पवार म्हणाले की, याआधाही महाविकास आघाडीतील नेत्यांवर अशाप्रकराच्या कारवाई झाल्या आहेत. माझ्याही नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीची कारवाई केली होती.
यापूर्वी ईडी, सीबीआयकडून कारवाई झाली, कोणाचाही हस्तक्षेप न होता चौकशी व्हायला हवी. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर देखील कारवाई होते, मात्र ही कारवाई पारदर्शक पद्धतीने कारवाई व्हायला हवी, असे अजित पवार यांनी सांगितले. याशिवाय, केंद्राच्या यंत्रणांना आणि राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार आहे. मात्र काही नेते जे बोलतात तेच घडतंय, त्यानुसार संबंधित नेत्यावर कारवाई होते, असा आरोप अजित पवार यांनी भाजप व केंद्रीय तपास यंत्रणांवर केला आहे.
7 ठिकाणी धाडी
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत. सीआरपीएफ जवानाच्या तुकड्याही त्यांच्यासोबत आहेत. वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. परब यांच्या संबंधित 7 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. अनिल देशमुख प्रकरणाचे तपास अधिकारी शिवालय बंगल्यात पोहचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनिल परब यांची चौकशी करण्यात येऊ शकते.
दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीचा छापा
दरम्यान, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची तक्रार भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. सीआरझेडचे उल्लंघन करून हे रिसॉर्ट बांधण्यात आले असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे होते. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्राच्या पर्यावरण विभागाचे एक पथक येऊन पाहणी करून गेले. त्यानंतर हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि ते पाडण्याचे आदेश देण्यात आले.
किरीट सोमय्यांनीही साधला निशाणा
अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनीही तयार राहावे. तसेच अनिल परब यांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा, असा खोचक सल्ला देखील किरीट सोमय्यांनी दिला आहे.