श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा; शेरोशायरी ऐकवत अजित पवारांचे विरोधकांना चिमटे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 07:09 AM2024-07-06T07:09:04+5:302024-07-06T07:09:37+5:30
‘सितम करोगे, सितम करेंगे, करम करोगे करम करेंगे हम आदमी है तुम्हारे जैसे जो तुम करोगे वह हम करेंगे’ या मंझर भोपालींच्या गझलेतील ओळी ऐकवत अजित पवार यांनी विरोधकांच्या फेक नरेटिव्हला आता सडेतोड उत्तर दिले जाईल, असे बजावले.
मुंबई - जे आम्ही केले त्याचे कौतुक करा, नाही नाही नाही यापेक्षा होय होय होय म्हणायला शिका. उगाच फेक नरेटिव्ह पसरवू नका असे म्हणत आणि ‘श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा’ या कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ओळी वाचून दाखवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना शुक्रवारी विधानसभेत भरपूर चिमटे काढले.
‘ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ती न कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा’ ही याच कवितेतील ओळ अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वातील जयंत पाटील आणि इतरांना काढल्याची कुजबुजही या निमित्ताने झाली. ‘जिन पत्थरों को हमने अता की थी धडकने, वह बोलने लगे तो हम पे बरसने लगे’ हा शेर ऐकवत त्यांनी आपण मोठी केलेली माणसे आज आपल्यावरच टीका करतात, अशी खंत त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे पाहत ऐकविला. ‘सितम करोगे, सितम करेंगे, करम करोगे करम करेंगे हम आदमी है तुम्हारे जैसे जो तुम करोगे वह हम करेंगे’ या मंझर भोपालींच्या गझलेतील ओळी ऐकवत अजित पवार यांनी विरोधकांच्या फेक नरेटिव्हला आता सडेतोड उत्तर दिले जाईल, असे बजावले.
‘बॉम्बे टू गोवा’ सिनेमा काढावा लागेल
मुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम रखडल्याचे मान्य करत अजित पवार म्हणाले, की अनेकांनी हा मार्ग आम्ही करूनच दाखवणार असे म्हणत फोटो काढले. खोटी आश्वासने दिली. आमदारकी, खासदारकी मिळविली. खरे तर या रखडपट्टीवर ‘बॉम्बे टू गोवा’ असा सिनेमाच काढायला हवा, पण आता नितीन गडकरी तिसऱ्यांदा भूपृष्ठ वाहतूक खात्याचे मंत्री झाले आहेत आणि हा मार्ग पूर्ण करणारच, असे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्प फुटला नाही
जनभावना लक्षात घेऊन अर्थसंकल्पात काय असावे, या विषयीचा अंदाज बांधणाऱ्या बातम्या माध्यमे देत असतात. मी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अशा काही बातम्या आल्या असल्या तरी अर्थसंकल्प फुटला असा त्याचा अर्थ होत नाही’ असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. अर्थसंकल्प मांडण्याच्या दिवशीच सकाळी वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांवरून काँग्रेसचे नाना पटोले, शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला होता.