“हे स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत, वाजपेयींची उंची आणि यांची...”; अजितदादांचा टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:56 PM2023-05-12T12:56:20+5:302023-05-12T12:57:18+5:30
Ajit Pawar: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यावर अजित पवारांनी खोचक टोला लगावला.
Ajit Pawar: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता महाविकास आघाडी तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधत सर्वोच्च न्यायालयाला नेमके काय म्हणायचे आहे, याबाबत सविस्तर सांगितले. यातच राष्ट्रादी काँग्रेसचे अजित पवार यांनी अखेर यावर प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर माझे मत मांडले होते. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण येईल असे म्हटले होते. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, त्यानंतरही ते पद रिक्त ठेवणे आमची चूक झाली, अशी कबुली देत नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना विचारात घेतले नाही. तो राजीनामा दिल्यावर लगेच विधानसभा अध्यक्षाबाबत महाविकास आघाडीने घ्यायला हवा होता. पण तो विषय तातडीने निकाला लागला नाही. अनेक काळ विधानसभेचे उपाध्यक्ष कामकाज पाहत होते. सत्तांतर घडल्यानंतर भाजप-शिवसेनेने तत्काळ विधानसभा अध्यक्षपद बहुमताने भरले, जर आमचा अध्यक्ष असता तर ही वेळ आली नसती, ते १६ आमदार त्यावेळीस अपात्र ठरले असते, असे अजित पवार यांनी नमूद केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांना विचारणा करण्यात आली.
वाजपेयींची उंची आणि यांची...
ठाकरे गटाकडून सातत्याने नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. अजित पवार यांना शिंदे-फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले असता, माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव घेत खोचक टोला लगावला. मागणी असून काही उपयोग नाही. अटल बिहारी वाजपेयी यांची उंची आणि आताच्या लोकांची उंची यामध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. हे अजिबात राजीनामा देणार नाहीत. कुणी मनात पण आणू नका. स्वप्नातही देणार नाहीत, तर प्रत्यक्षात कधी देणार, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला.