Ajit Pawar: ...या गोष्टी बंद केल्या पाहिजेत, अजित पवारांनी काँग्रेस नेत्यांना स्पष्टपणे बजावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 02:23 PM2023-04-12T14:23:34+5:302023-04-12T14:44:14+5:30
Ajit Pawar: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या काही विधानांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांकडून विविध मुद्द्यांवर परस्परविरोधी मतं व्यक्त होत आहेत. त्यामुळे मविआमध्ये बिघाडी होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या काही विधानांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.
अजित पवार म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्य करतात. आम्हालाही काही मिळते. कारण नसताना महाविकास आघाडीमध्ये अंतर पडू शकतं. त्या गोष्टी मीडियापर्यंत जाण्यापेक्षा त्यांनी जयंत पाटील यांच्याशी बोलावं, माझ्याशी बोलावं, उद्धव ठाकरें शी बोलावं, आदित्य ठाकरेंशी बोलावं. याच्यातून मार्ग निघू शकतो. टाळी एका बाजूने वाजत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या आल्या की महाराष्ट्रातील घटक पक्षांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, तोसुद्धा संभ्रमामध्ये पडतो. त्यामुळे या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. आता ज्यावेळी महाविकास आघाडीची सभा होईल. त्यावेळी मी हे मुद्दे तिथे मांडणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
मात्र काँग्रेसच्या संदर्भात त्यांचा जो अंतर्गत प्रश्न आहे त्यावर मला बोलायचं नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या पक्षाचे प्रश्न आपापल्या पातळीवर सोडवावेत. आम्हाला त्याबाबत सूचना करण्याचाही अधिकार नाही आणि नाक खुपसायचा पण अधिकार नाही. मात्र ही आघाडी टिकावी महाविकास आघाडी टिकावी, असं आम्हाला वाटतं, असंही अजित पवार यांनी सांगितलं.