मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार नवनीत रवी राणा यांच्या हनुमान चालिसावरून आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. त्यातच या दोघांना भाजपाची साथ मिळत असल्याने ठाकरे सरकारसमोर कायदा सुव्यवस्थेसोबतच राजकीय संकट देखील उभे ठाकले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला गेले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांना मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षावर उद्धव ठाकरेंशी दीड तास चर्चा केली होती. राज ठाकरे यांनी मशीदींवरील भोंगे काढण्यासाठी येत्या ३ मेची मुदत दिली आहे. त्यानंतर त्या मशीदींसमोर स्पिकर लावून हनुमान चालिसा वाचली जाणार आहे. यामुळे राज्यात जातीय दंगली उसळू शकतात अशी माहिती गुप्तचर संस्थांनी पुरविली आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी भेट घेतल्याने चर्चांना उधान आले आहे. महाराष्ट्र सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे की, भाजपाला या साऱ्यापासून दुर करण्याच्या प्रयत्नात आहे, हे समजणार आहे.