अजित पवार मनसे प्रमुख राज ठाकरेंशी बोलणार; रात्रीपर्यंत चर्चा होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 06:57 PM2022-11-15T18:57:18+5:302022-11-15T18:58:15+5:30
आमच्या सगळ्यांचे एकमत झाले तर राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेईन असं अजित पवार म्हणाले.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या पक्षाचे नव्हते. ते सगळ्यांचे होते. भेदभाव करण्याचं कारण नाही. हर हर महादेव सिनेमात जे दृश्य दाखवलं त्याबाबत रात्री उशिरापर्यंत मी मनसे प्रमुख राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही भेट घेणार असल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अजित पवार म्हणाले की, हर हर महादेव सिनेमात ज्या काही गोष्टी दाखवल्या आहेत त्याबाबत मी राज ठाकरेंशी बोलून त्यांच्या अख्यारित काही असेल. त्यांना पटत असेल त्यांनी हस्तक्षेप करावा. हा पक्ष तो पक्ष असा भेदभाव करण्याचं कारण नाही. मी सिनेमा पाहिलाय, पण माझ्यापेक्षा ज्यांना इतिहासाचं ज्ञान आहे अशांना घेऊन सिनेमा पाहेन. आमच्या सगळ्यांचे एकमत झाले तर राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेईन. इतिहासातील घटनांची तोडमोड करून दाखवण्याचा वेगळा प्रयत्न चाललाय हा भूषणाह नाही. महाराष्ट्राला परवडणारं नाही असं मी नक्की सांगेन अशी माहिती अजितदादांनी दिली.
हर हर महादेव सिनेमावरून वादंग
हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले, तसेच कोण जितेंद्र आव्हाड असा सवाल केल्याने, संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली होती. यानंतर मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आव्हाडांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती.
या चित्रपटात राज ठाकरेंचा आवाज वापरण्यात आला आहे. त्यात चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली. त्यानंतर हर हर महादेव' या चित्रपटावर कोणीही भाष्य करू नये, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना दिल्या. या प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेस जातीय रंग देत असून सध्या या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या असल्याची माहिती समोर आली होती.