"तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला...", शिंदेंच्या फुलटॉसवर अजित पवारांचा षटकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 19:53 IST2025-03-02T19:50:34+5:302025-03-02T19:53:15+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. या परिषदेत खुर्चीवरून शिंदेंनी केलेल्या विधानाला अजित पवारांनी उत्तर दिले आणि हास्याचे कारंजे उडाले.

"तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला...", शिंदेंच्या फुलटॉसवर अजित पवारांचा षटकार
Eknath Shinde Ajit Pawar: 'तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू?' उपमुख्यमंत्रीअजित पवारांच्या विधानावर हास्याचे कारंजे उडाले. हा प्रसंग घडला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत! उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे असं काय बोलले की, अजित पवारांना उत्तर देण्याचा मोह आवरता आला नाही? वाचा...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरूवातीला निवेदन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बोलण्यास सुरूवात केली.
शिंदे का म्हणाले, अजित पवारांना टेन्शन नाही?
एकनाथ शिंदे म्हणाले, "सरकारची नवी टर्म असली, तरी आमची टीम जुनीच आहे. (देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट करत) फक्त आमच्या दोघांच्य खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे आपलं नो टेन्शन."
शिंदेंचे हे विधान ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना हसू अनावर झालं.
अजित पवारांचं उत्तर अन् फडणवीस म्हणाले फिरती खुर्ची
त्यानंतर अजित पवार म्हणाले, "तुम्हाला फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू?" हे अजित पवारांचे विधान ऐकून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस खळखळून हसले आणि सभागृहातही हास्याचे कारंजे उडाले.
त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "ठीक आहे, आमच्यात समजूदारपणा आहे." तोच धागा धरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमची फिरती खुर्ची आहे."
विरोधकांचा गळता संकल्प
एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिमटा काढला. "अजित पवार पुन्हा एकदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण, विरोधकांचं काय? ते काय मांडणार आहेत? त्यांचा तर गळता संकल्पच सुरू आहे."
शिंदेंनी विरोधकांना काय दिला इशारा?
"मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी, काही हरकत नाही. पण, सूड भावनेतून, द्वेष भावनेतून टीका केली, तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल. कारण शेवटी सहन करण्याची एक मर्यादा असते. प्रत्येकाची सहनशक्तीची क्षमता असते", असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिला.