-मोसीन शेख
मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून सत्तास्थापनेचा दावा करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याने काल मोठा राजकीय भूकंप अनुभवला होता. यावरून कालचे वातावरण ढवळून निघाले होते. आज सकाळी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या चर्च गेट येथील निवास्थानी भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, उलट-सुलट काहीच होणार नाही.
अजित पवार हे काल मध्यरात्री आपले बंधू श्रीनिवास पाटील यांच्या घरातून निघून आपल्या चर्च गेट परिसरातील निवास्थानी दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. तर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भेट देत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांची भेट घेऊन आलेले औरंगाबादमधील पैठण येथील राष्ट्रवादीचे नेते अप्पासाहेब निर्मल पाटील यांनी ही माहिती लोकमतला दिली आहे.
पाटील म्हणाले की, आज सकाळीच आम्ही अजित पवारांची भेट घेतली असून जवळपास 15 मिनटांपेक्षा अधिक वेळ त्यांच्यासोबत गप्पा झाल्या. अजित पवार यांच्याबरोबर बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर चिंता असल्याचे जाणवले नाही. त्यांनी आमच्या सोबत मनमोकळ्यापणाने चर्चा केली. तसेच बाहेर उलट-सुलट चर्चा सुरु असल्याचे त्यांना विचारले असता, उलट-सुलट काहीच होणार नसल्याचे पवार म्हणाले असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
त्याचबरोबर अजित पवारांनी पहिल्यांदाच एवढावेळ आम्हाला दिला. तर यावेळी त्यांनी पैठण मतदारसंघातील परिस्थितीची माहिती विचारली असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले आहे. तसेच अजित पवारांचा निर्णय आम्हाला मान्य असणार असून ते योग्यच निर्णय घेतील असेही पाटील म्हणाले.