Maharashtra Winter Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. यानंतर आता महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ०७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पावसाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर अजित पवार मीडियाशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांशी बोलून हा निर्णय घेतला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. या अधिवेशनात जेवढी बिले सत्ताधारी पक्षाने आणली त्यातली जवळपास सर्व बिले आम्ही मंजूर केली. माथाडी कामगारांच्या संदर्भातील बिलांबद्दल सगळ्यांची मतमतांतरे होती. असे जेव्हा होते तेव्हा संयुक्त समितीकडे ते विधेयक पाठवले जाते. माथाडी कामगारांविषयीच्या विधेयकासंदर्भात पुढच्या अधिवेशनापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका होतील. काही सूचनांचा अंतर्भाव केला जाईल आणि ते बिल आणले जाईल, असे अजित पवारांनी सांगितले.
जे विधेयक आणू ते शेतकऱ्यांच्या हिताचे असेल
शेतकऱ्यांसाठी खते आणि बी बियाणे जे येते आहे त्यात भेसळ वाढली आहे. यासंदर्भात बऱ्याच तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे आणि सरकारकडे आल्या. त्यानंतर आम्ही यासंदर्भात विधेयक आणायचा निर्णय घेतला. त्यातही चर्चा करणे गरजेचे होते त्यामुळे ती बिलेही आपण संयुक्त समितीकडे पाठवले आहे. धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली ती समिती गठीत करण्यात आली आहे. शेतकरी वर्गाचे नुकसान होणार नाही याकडे आमचे लक्ष असेल. तसेच जे विधेयक आणू ते शेतकऱ्यांच्या हिताचे असेल, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, एकही दिवस सभागृहाचे कामकाज बंद पडू दिले नाही. दररोज भरपूर काम करण्यात आले. विरोधी पक्षांना काही भूमिका घ्यावी लागते ती त्यांनी घेतली. त्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटण्याचे कारण नाही. २२५ आमदारांचे बहुमत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने आहे. त्यात अपक्ष आमदारही आले. समोर संख्येने कमी बळ होते. पण त्या संख्येलाही आम्ही महत्त्व दिले आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, लक्षवेधींना, मुद्द्यांवर आम्ही उत्तरे दिली, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.