मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजीनाम्यावरून त्यांची भुमिका आज पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी त्यांनी आजच्या शरद पवार यांच्या भेटीवेळचीही माहिती दिली.
अजित पवार यांची आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मनधरणी केली. सुमारे तासभर बैठक सुरु होती. यानंतर अजित पवारांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले. मात्र, आचारसंहितेमुळे त्यांनी स्थळ बदलत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली.
आजची पत्रकार परिषद ही शरद पवारांच्याच सांगण्यावरून घेत असल्याचे अजितदादा म्हणाले. शरद पवारांना भेटून त्यांच्यासमोर बाजू मांडली. पुण्यात जाणार होतो पण पवारच मुंबईत असल्याने मी घरी भेट घेतली आणि सविस्तर माहिती दिल्याचे अजितदादांनी सांगितले.
यानंतर पवारांनी काय सांगितले या प्रश्नावर त्यांनी पत्रकार परिषद घेण्यास सांगितल्याचे अजितदादा म्हणाले. तुम्ही राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत, याबद्दल पत्रकार परिषद घ्या, असे पवारांनी सांगितले. यानंतर पवारांनी मी तुमचे ऐकून घेतले, यापुढे मी सांगेन ते ऐकायचे आणि तसेच वागायचे, असे म्हटले. पवारांच्या या बोलण्यावर मी त्यांच्याशी नजरही मिळविली नाही आणि मान खाली घालून निघून आलो, असे अजित पवार यांनी सांगितले.
शब्द आमच्यासाठी अंतिम शरद पवार यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, विशेष म्हणजे कुटुंबातील कलहाबाबत बोलताना अजित पवारांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करताना अजित पवारांनी यापूर्वीही 72 हजार कोटींचा घोटाळा असं म्हटलं. तर, आताही 25 हजार कोटींचा घोटाळा काढलाय, म्हणजे तुम्हालाही वाटेल ह्या अजित पवारला काही हजार कोटींशिवाय जमतच नाही का?. अहो, मीही तुमच्यासारखा माणूसचं आहे, मलाही भावना आहेत, असं म्हणता अजित पवारांमधील भावनिक माणूस महाराष्ट्राला पाहायला मिळाला. अजित पवारांच्या डोळ्यात पाणी तरळले, तसेच या घोटाळ्याशी माझा संबंध नसून जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं जातंय, असेही अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.