मुंबई - राज्याच्या राजकारणात अनेक पुतणे आपल्या काकांना सोडून गेल्याचा इतिहास आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हात मिळवणी केली आहे. मात्र ही हातमिळवणी महाराष्ट्रातील जनतेला रुचली नसल्याचे चित्र आहे. एवढंच काय तर अजित पवार यांना गद्दार म्हणून संबोधण्यात येत आहे.
राज्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून काका-पुतण्याच्या वादाची परंपरा राहिली आहे. पेशावाईपासून चालत आलेल्या या परंपरेला शरद पवारांनी फाटा दिल्याचे सांगण्यात येत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे, गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे तिन्ही पुतणे शरद पवारांसोबत आहे. त्यामुळे पुतण्यांना सांभाळायचे कसब शरद पवारांमध्येच अशा चर्चांना कधी काळी उधाण आले होते. मात्र आता त्यांनाच पुतण्याने धक्का दिला आहे. मात्र पवारांनी देखील आपल्या पुतण्याविरुद्ध दंड थोपटले आहेत.
दरम्यान अजित पवारांनी आपल्या काकांना धक्का देण्याचा घेतलेला निर्णय सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. आजपर्यंतच्या सर्व पुतण्यांना जनतेने आणि त्या-त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला होता. मात्र अजित पवारांच्या बाबतीत असं होताना दिसत नाही. अजित पवारांवर सोशल मीडियामधून कडाडून टीका होत आहे. एवढच नाही तर त्यांना गद्दार म्हणून संबोधले जात आहे. ज्या बारातमी मतदार संघातून अजित पवार विक्रमी मतांनी निवडून आले, तेथे देखील त्यांना विरोध होत असून शरद पवारांना पाठिंबा दर्शवित आहे.
फेसबुकवरील 99 टक्के पोस्ट सध्या तरी अजित पवार यांच्या विरोधात दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीप्रमाणेच आता देखील शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होत आहे.