Ajit Pawar vs Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सध्या दोन गट पडले असून ते दोन गट म्हणजे शरद पवार गट व अजित पवार गट असे मोठे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत केलेल्या विधानाने रणकंदन माजले असताना, भाजपा व शिंदे गटाकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अजितदादांचे कान टोचल्याच्या बातम्या आल्या होत्या. तशातच, आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले. त्यावरून राष्ट्रवादीत दोन गट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावर आता राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आला आहे.
आज प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिन पार्टी व एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात आघाडीची घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीतील दोन गटांचा उल्लेख केला. पण राष्ट्रवादीची धास्ती वाटत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी असे पोरकट विधान केले असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असावा म्हणूनच राष्ट्रवादीत दोन गट आहेत असे पोरकट विधान त्यांनी केले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारक व शौर्य पुरस्कार याबाबत त्यांची भूमिका मांडली व एकंदरीतच छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अजित पवार यांना किती आदर आहे व कृतीतून ते व्यक्त करण्याचा कसा प्रयत्न त्यांनी केला या सर्व गोष्टी समोर आल्या," असे तपासे म्हणाले.
"अजितदादांच्या बदनामीचा कट रचणारे आज उघडे पडून निरुत्तर झाले. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदींवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करण्याचे टाळले आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत असा हास्यस्पद दावा त्यांनी केला," अशा शब्दांत त्यांनी शिंदे यांची खिल्ली उडवली.
दरम्यान, अजित पवार म्हणाले होते की, स्वराज्य रक्षक ही उपाधी सर्वसमावेशक आहे. काही जण संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात, काही जण स्वतः धर्मवीर लावतात. काहींचे चित्रपट निघाले, त्या चित्रपटाचा भाग दोन पण येणार आहे, असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता. त्यावरून आज एकनाथ शिंदे यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पण आता त्यावर राष्ट्रवादीने पुन्हा पलटवार केला आहे.