उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निधी वाटपासंदर्भात नाराजी व्यक्त केली असल्याचा दावा केला जात आहे. या प्रश्नावर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी महायुती सरकार मजबूत असून सर्व निर्णय सामंजस्याने घेतले जात असल्याचे म्हणत, अजित पवार निधी वाटपा संदर्भात कुठल्याही प्रकारे नाराज नसल्याचे म्हटले आहे.
दादा भुसे हे आज धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी महायुतीमध्ये निधी वाटपाच्या संदर्भात अजित पवार नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांनंतर शिंदे गटाचे बरेच नेते हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांना रोज सकाळी काही ना काही उठून बोलावे लागते म्हणून त्यांनी हे विधान केले आहे. महाराष्ट्र आता त्यांना महत्व देत नाही असे म्हणत राउतांवर टीका केली आहे. तर रोहित पवारांच्या वयाला त्यांचे हे बोलणे शोभत नसल्याचे म्हटले आहे.
भाजपा तर्फे हिंदू-मुस्लिम पेटविण्याचा सतत प्रयत्न असतो आणि आता मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटविला जात असल्याच्या संजय राऊत यांच्या विधानाला देखील भुसे यांनी उत्तर दिले आहे. टीका करणाऱ्यांना महाराष्ट्र सतत पेटत ठेवायचा असून, सध्या जरांगे पाटील यांचा प्रश्न मार्गी लागत असल्याने, जरांगे पाटलांच्या मागण्या आता पूर्ण होत असल्याने, त्याचे दुःख संजय राऊत यांना असल्याचा टोला भुसे यांनी लगावला.