अजित पवार राष्ट्रवादीत नाराज?; पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 12:27 PM2022-09-12T12:27:59+5:302022-09-12T12:38:30+5:30
मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोला असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले.
मुंबई - दिल्लीत राष्ट्रवादीचं २ दिवसीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय नेत्यांनी पक्षाची धोरणे आणि कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी मार्गदर्शन केले. मी राष्ट्रीय पातळीवर जास्त भाष्य करत नाही. मला बोलण्याची संधी दिली परंतु वेळेअभावी बोलता आले नाही. केवळ मी नाही तर सुनिल तटकरे, वंदना चव्हाण आणि ५-६ जणांना भाषण करता आले नाही. शरद पवारांचे ३ वाजता समारोपाचं भाषण सुरू होणार होते. नाराजीच्या बातम्यांना काहीही अर्थ नाही अस सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजीच्या बातमीवर खुलासा केला आहे.
अजित पवार म्हणाले की, पक्षाने मला उपमुख्यमंत्रिपद दिले, विरोधी पक्षनेतेपद दिले. मी नाराज कशाला होऊ? राष्ट्रवादीने मला कधी डावललं नाही. मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोला असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तूस्थिती आधारित बातमी देण्याची जबाबदारी माध्यमांसमोर आहे. मी २१ वर्षात राष्ट्रीय पातळीवर जातो परंतु कुठे भाष्य करत नाही. राज्यात अधिवेशन असलं, कार्यक्रम असलं तर मी भाषण करतो. तुमचे गैरसमज दूर करून राज्यासमोरील प्रश्नाबाबत भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे असं त्यांनी म्हटलं.
लम्पी आजारावर सरकारनं भूमिका मांडावी
राज्यात जनावारांमध्ये लम्पी स्किन फैलावत आहे. जनावरं दगावली तर त्याचा शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम होणार आहे. मार्च २०२० मध्ये गडचिरोली हा आजार पहिल्यांदा आला. आता राज्यात अनेक भागात रोग पसरतोय. यावर राज्य सरकारनं काय उपाययोजना केल्यात आणि लोकांमधील संभ्रमावस्था दूर करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. १६ तारखेला मुख्यमंत्र्यांनी साखर कारखाने सुरू करण्याबाबत बैठक आयोजित केली. कारखान्यावर मोठ्या प्रमाणात बैल वाहतुकीने ऊस आणला जातो. बैलावर लम्पी आजार फोफावला तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. सरकारने या संकटाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं. लोकांमध्ये जागरुकता आणली पाहिजे. खबरदारी काय घ्यायची याचं पत्रक काढावं असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण झाले पाहिजे. त्यात बैल, गाय आणि ४ वर्षावरील खोंडांचं लसीकरण झाले पाहिजे. केंद्राकडून लस कमी प्रमाणात येत असेल तर परदेशातून लस मागवा परंतु शेतकऱ्यांच्या जनावरांना संकटातून बाहेर काढलं पाहिजे अशीही मागणी अजित पवारांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी जमवावी लागणं हे दुर्देव
तसेच औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांना हजर राहण्याबाबत पत्रक काढून आदेश देण्यात आले. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडतंय. अंगणवाडी सेविकांना सभेला बोलावलं तर मुलांकडे लक्ष कोण देणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांला गर्दी जमवण्यासाठी अशाप्रकारे आदेश काढले जात असतील तर हे दुर्देव आहे. आता सत्ताधारी म्हणतील परस्पर हे पत्रक काढलं गेले. परंतु आम्हीही सरकारमध्ये होतो असं परस्पर कुणी पत्रक काढत नाही असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.
२ महिने जिल्ह्यांना पालकमंत्री नाही
राज्यात नवं सरकार आल्यानंतर कॅबिनेट विस्तार करायला विलंब केला. त्यानंतर आता जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री नेमले नाहीत. आमदारांमध्ये नाराजी वाढेल यासाठी मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार पुढे ढकलला जात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या संकटाकडे लक्ष द्यायचं कुणी? १६ जिल्ह्यात झेंडावंदन करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नेमावं लागलं. सरकारच्या या कारभाराचा मी धिक्कार करतो असं सांगत अजित पवारांनी घणाघात केला.