अजित पवारांना ईनमीन चार जागा, त्यातही एक शिंदेंचा, दुसरा भाजपचा उमेदवार आयात; पुढे काय...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 07:03 PM2024-04-11T19:03:33+5:302024-04-11T19:24:15+5:30
Ajit pawar vs Sharad Pawar News: अजित पवारांच्या वाट्याला सध्यातरी ४८ पैकी चार जागा आल्या आहेत. थोरल्या पवारांना टक्कर देण्याच्या नादात अजित पवारांना स्वपक्षातील उमेदवारच सापडलेले नाहीएत, अशी परिस्थिती राष्ट्रवादीवर आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत शरद पवार यांना आव्हान दिलेय खरे परंतु महायुतीत अजितदादांना जागा वाटप करून घेताना फार कमी स्थान मिळाले आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांनी आपल्या वाट्याला १० जागा मिळविल्या आहेत. एकूण ४८ पैकी १० ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे, तिथे एखादा उमेदवार सोडता सर्व पक्षातीलच उमेदवार उभे करणार आहेत. परंतु, दुसरीकडे थोरल्या पवारांना टक्कर देण्याच्या नादात अजित पवारांना स्वपक्षातील उमेदवारच सापडलेले नाहीएत.
अजित पवारांच्या वाट्याला सध्यातरी ४८ पैकी चार जागा आल्या आहेत. त्यापैकी बारामतीची जागा अजित दादांची पत्नी सुनेत्रा पवार लढत आहेत. तिकडे रायगडमधून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे लढत आहेत. हे दोन सोडले तर अजित पवारांना उर्वरित दोन मतदारसंघांत शिंदे गट आणि भाजपाकडून उमेदवार आयातच करावे लागले आहेत.
शरद पवारांना टक्कर देता देता अजित पवारांना महायुतीतही जागा सोडवून घेताना नाकीनऊ आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शरद पवार गटातच राहिल्याने अजित पवारांकडे त्या ठिकाणी उमेदवारच सापडला नाही. यामुळे त्यांना शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटील यांना आयात करावे लागले आहे. पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे.
दुसरीकडे धाराशीवमध्ये अजित पवारांना उमेदवार सापडलेला नाही. तिथे भाजपाचा उमेदवार राष्ट्रवादीकडून लढणार आहे. अशा या जागावाटपात अजित पवारांकडे दोन उमेदवार घरचे आणि दोन बाहेरचे असे बळ आहे. तर नाशिकची जागा अद्याप कोणाला जाणार हे नक्की झालेले नाहीय. तिकडे शिंदेंचे खासदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. तर भुजबळ दिल्लीतून निरोप असल्याचे सांगत फिरत आहेत. अशात ही जागा जर अजितदादांकडे आली तर ठीक नाहीतर राष्ट्रवादीचे २०१९ मध्ये जेवढे खासदार निवडून गेले होते, तेवढ्याच आकड्याच्या जागांवर लढण्याची वेळ अजित पवारांवर येणार आहे.