पुणे - अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. विशेषत: पवार कुटुंबाचं वर्चस्व असणाऱ्या बारामतीत आता पवारविरुद्ध पवार अशी लढाई होण्याची चिन्हे आहेत. त्यात बारामतीत एक निनावी पत्र व्हायरल झालं असून त्यातून अजित पवारांवर थेट निशाणा साधण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या या पत्रावर रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांना थेट भावना व्यक्त करता येत नाहीत ते अशाप्रकारे पत्रामाध्यमातून भावना व्यक्त करतात. मला दोनवेळा शरद पवारांनी राजकारणात येण्यापासून रोखले नाहीतर आज जे घडतंय त्याची सुरुवात तेव्हाच झाली असती असं राजेंद्र पवार म्हणाले.
तर आमच्या कुटुंबात जे काही महत्त्वाचे मोठे निर्णय होतात ते सर्व कुटुंबाच्या विचाराने घेतले जातात. माझे लग्न ठरले तेव्हा काका बापूसाहेब पवार सर्वच विधीत सहभागी होते, माझे कन्यादान प्रताप पवारांनी केले, लग्नाचे कार्ड अप्पासाहेब पवारांच्या नावाने गेले. त्यामुळे कुठलेही महत्त्वाचे निर्णय होतात, मलाही राजकारणात येण्यासाठी कौटुंबिक बैठक झाली त्यातून निर्णय झाला. एखाद्याला कधीतरी एक पाऊल पुढे मागे घ्यावे लागते. तोदेखील त्याग कुटुंबातील अनेकांनी केला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी खूप प्रिय आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
काय लिहिलंय 'त्या' व्हायरल पत्रात?
अजितदादा पवारांनी हे प्रकरण विनाकारण भाव भावकीच्या तालावर आणून ठेवलंय. पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. स्व. शारदाताई पवार या त्यावेळच्या लोकल बोर्डाच्या मेंबर म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर अप्पासाहेब पवार ( रोहित पवारांचे आजोबा ) आपले बंधू शरद पवार यांच्यासोबत शेकापचं काम करू लागले. पण शरदरावांचा ओढा काँग्रेसकडे होता याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि अप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला. पुढची पिढी जेव्हा तयार होती तेव्हा स्व. अनंतरावांचा मुलगा अजित आणि अप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचे याबाबत विचार होत होता. तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असूनही अजित पवारांना पुढे केले.
दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून देखील घेतले तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही. पुढचा इतिहास माहितच आहे. पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणून सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, एक बारामतीकर अशा उल्लेखाने हे पत्र सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले आहे.