बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 07:16 AM2024-05-10T07:16:56+5:302024-05-10T07:17:22+5:30
Ajit pawar Vs Supriya Sule: शरद पवारांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी नाही : अजित पवार; सुळे म्हणाल्या, अजून काय द्यायचे राहिले? तुलना करा...
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव (पुणे) : पवार कुटुंबात अनेकदा चर्चेत असलेला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 'आदरणीय शरद पवार आमचे नेते आहेत; मात्र वयानुसार त्यांनी थांबले पाहिजे, असे सांगतानाच 'मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही,' असाही टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत शरद पवार यांना लगावला.
केंदूर (ता. शिरूर) येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, 'शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. मात्र, वयाच्या ऐंशीनंतर त्यांनी थांबलं पाहिजे. स्वतःची तब्येत सांभाळली पाहिजे. कारण, आम्ही कारभार करायला खंबीर आहोत. त्यासाठी आमच्यासारख्या काम करणाऱ्या नेत्यांच्या हातात पक्षाची सूत्रे देऊन पवार साहेबांनी मार्गदर्शन करून आशीर्वाद देणे अपेक्षित होते; परंतु साहेबांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला. आता माझंही वय होत आलंय. मला काही तरी चांगलं काम करून दाखवायचे असून, पुतणे म्हणून मते घ्यायची नाहीत. विकासकामे करायची असतील, तर मोदींचे हात बळकट करावे लागणार आहेत.'
'अमोल कोल्हे यांना तिकीट दिले, ही माझी चूक'
ओतूर : 'पाच वर्षांपूर्वी मी तुम्हाला न विचारता अमोल कोल्हे यांना तिकीट दिले, ही माझी चूक झाली. जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून उमेदवारी देण्याचा मी अभ्यास केला. लगेच जाहीर केले; पण नंतर पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपला कारभार केला, कधी माझ्या आदिवासी भागात आले नाहीत, कधी कुणाला भेटले नाहीत. कारण, स्वतः सेलिब्रिटीमध्ये रस होता. माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट दिले, ही माझी चूक झाली आहे, ती चूक सुधारा,' असे अजित पवार यांनी ओतूर येथील सभेत केले.
'तुम्हीच तुलना करा कोणाला काय मिळाले'
मंचर (पुणे) : 'अजित पवार यांचा स्वभाव मला माहीत आहे. तुम्हीच तुलना करा, की कोणाला काय मिळालं. मला काय मिळालं आणि दादांना काय- काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे,' या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
त्या म्हणाल्या, 'नाती जोडायला ताकद लागते. पक्ष फुटला, चोरले हे जे काही सुरू आहे. ते चुकीचे आहे. प्रेमाने मागितले असते, तर सर्व दिलं असतं. त्यामुळं मंत्रिपद महत्त्वाचं की निष्ठा महत्त्वाची,' असा सवाल उपस्थित केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अजून काय द्यायचे राहिले? शरद पवार यांनी अजितदादांना अनेक पदे दिली. पहाटेचा शपथविधी घेऊन आल्यानंतरही त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री केले. यापेक्षा अजून काय द्यायचे राहिले आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर येथे व्यक्त केले.