अजित पवारांनी आज त्यांच्या भाषणात जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. याला आव्हाड यांनी जोरदार प्रत्तूत्तर दिले. विलास मुत्तेमवार यांचे तिकीट बदलून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना दिलेले. तुमच्यापेक्षा कमी सत्ता शरद पवारांनी भोगली, तुम्हाला सत्ता दिली, तुम्हाला सगळे दिले ही शरद पवारांची चूक झाली का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
काकांना गिळून टाकायला निघालेत. आपल्यासाठी कुणी काय केले आणि तुम्ही काय करताय? पवारांनी वटवृक्ष निर्माण केला, त्या वृक्षावरील घरट्यातून त्यांना काढून टाकायला निघालात. शरद पवारांवर कशाप्रकारे दबाव टाकला जात होता, ते सर्वांना माहिती आहे. जितेंद्र आव्हाडकडे कारखाने नाहीत, बँका नाहीत, पैसा नाहीय एवढे सगळे करून तो बोलायचे थांबत नाही. कोणावर तरी नारळ फोडायचा असतो, तसा माझ्यावर फोडला, अशी टीका आव्हाड यांनी केली.
राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या संघटनांची, विभागांची सोशल मीडियावर पेजेस आहेत. त्यांना धमक्या दिल्या जातायत. त्या पेजेसचा ताबा आमच्याकडे द्या, त्या पोरांनी माझ्याकडे लिखीत तक्रार दिली आहे. आजच्या भाषणातून शरद पवारांना हाकलायचेच होते हे समोर आले. वय असते तर ठीक ज्या माणसाचे आता वय नाही त्याला हाकलण्यासाठी एवढा आटापिटा. काही लोकांनी शरद पवारांना सांगितले की जितेंद्रही आमच्यासोबत आहे. त्यांनी मला फोन केला अन् विचारले तेव्हा मी त्यांना म्हणालो, साहेब त्यांच्यासमोर नाही कसे म्हणणार, तेव्हा पवार हसले होते, असा किस्सा आव्हाडांनी सांगितला.
मी त्यांच्या कोणत्याही गुप्त बैठकांना आजवर हजर राहिलो नाही. मला बोलावलेच गेले नाही. एक शुद्र म्हणून मला काय वागणूक दिली गेली ते मला माहिती आहे. नाही बोलवले नाही बोलवले, मला काही फरक पडला का? मी काळा पडलो का? माझ्याकडे कारखाना, बँका नसताना मी हे विश्व उभे केले, असे आव्हाड म्हणाले.
माझ्यामुळे कथोरे गेले? व्वा! गणेश नाईक का गेले हे एकदा शरद पवारांना विचारा, माझ्यासारख्या शुद्राचे नाव त्यांच्या तोंडात यावे हे माझे भाग्य आहे. धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी नाही म्हटलेले, त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन शपथ घेऊन सांगावे. मला कोणाचे घर फोडण्यात रस नाही, हे योग्य नाही असे शरद पवार म्हणाले होते. तेव्हा धनंजय मुंडे मला यायचेच आहे, मला यायचेच आहे असे सांगत राहिले, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
शरद पवारांचा लोकांशी संपर्क तोडायचा होता. लोकांना त्यांच्याशी तोडायचे होते. यासाठी हे रचलेले षडयंत्र आहे. आज तुम्ही शरद पवार घरी बसा अशी घोषणा द्यायला हवी होती, असा टोला आव्हाड यांनी लगावला.