Ajit Pawar Warning: "याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल"; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 09:20 PM2022-12-29T21:20:11+5:302022-12-29T21:20:41+5:30
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणात अजितदादांचा संताप
Ajit Pawar Warning Eknath Shinde Devendra Fadnavis led Govt: औद्योगिकदृष्ट्या अव्वल असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यातून मोठमोठे उद्योग बाहेर चालले आहेत. युवकांचे रोजगार बुडत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्री, अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. अंधश्रद्धांना खतपाणी घातले जात आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. उच्चपदस्थ व्यक्ती, मंत्री, लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये सातत्याने केली जात आहेत. यातून कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही. सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा स्पष्ट इशारा देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विरोधी पक्षांतर्फे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांनी महापुरुषांबद्दलची अवमानकारक वक्तव्ये, मंत्री व अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, राज्याबाहेर चाललेले उद्योग, त्यामुळे वाढलेली बेरोजगारी, महिलांवरील वाढते गुन्हे, अंधश्रद्धेला घातले जाणारे खतपाणी असे अनेक मुद्दे उपस्थित करत राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी. भ्रष्टाचार करणारे सत्तारुढ किंवा विरोधी पक्षातील असले तरी त्यांच्यावर कारवाई करावी. महिलांना संरक्षण द्यावे. राज्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण करुन उद्योगांना राज्याबाहेर जाण्यापासून रोखावे, अशा अनेक मागण्या अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात केल्या. महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही पाठींबा देऊ, असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणातील ठळक मुद्दे
- संपूर्ण देशात महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत आघाडीवर राहिलेले राज्य आहे. राज्यातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, धोरणातील सातत्य, कुशल मनुष्यबळ, यामुळे आपण सातत्याने पहिल्या क्रमांकावर होतो.
- आज महाराष्ट्र वेगळ्या परिस्थितीतून जातो आहे. मोठमोठे उद्योग एकामागून एक राज्याबाहेर जात असताना सत्तेवर असलेले महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत.
- वेदांत-फॉक्सकॉनसारखा मोठा उद्योग गुजरातला गेला, ही वस्तुस्थिती आपल्यासमोर आहे. राज्याराज्यांमध्ये स्पर्धा असते, ती यापूर्वीही झालेली आहे. पण सातत्याने काही प्रकल्प, काही उद्योग, काही संस्था महाराष्ट्रातून बाहेर जात असतील तर त्याची चर्चा झाली पाहिजे.
- जनतेला आणि विरोधकांना उद्योग का बाहेर गेला हे सांगण्याऐवजी तुम्ही महाराष्ट्र आणि गुजरातच्या लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
- "महाराष्ट्र येत्या दोन वर्षात गुजरातच्या पुढे नेऊ, गुजरात म्हणजे लहान भाऊ, पाकिस्तान नाही", अशी सारवासारव उपमुख्यमंत्र्यांनी वेदांत-फॉक्सकॉन गुजरातला गेल्यानंतर केली.
- अहो, मोठ्या भावाचा (शिवसेना) हात धरुन लहान भाऊ (भाजपा) कधी "मोठा" झाला, मोठ्या भावाचे घर कसे मोडले, हे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. बहुदा, तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्ही करणार नाही ना?
- गुजरातविषयी कुणाला आकस असण्याचे कारण नाही. गुजरातला पाकिस्तान मानण्याची तर अजिबात गरज नाही आणि कोणताही पक्ष तसे मानत नाही. महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आणि जनता गुजरात आणि गुजराती जनतेबद्दल प्रेम बाळगुन आहे.पण अपयश झाकण्यासाठी तुम्हाला पुन्हा "पाकिस्तान" ला मध्ये आणावे लागले. हाच तर तुमचा खेळ आहे, जो गेल्या १५ वर्षापासून भारतातील जनता पाहते आहे.