Shalini Patil Vs Ajit Pawar ( Marathi News ) :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करत राज्यात राजकीय भूकंप घडवला. या बंडाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच बारामती इथं बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावत पवार यांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्याविरोधात केलेल्या बंडाची आठवण करून दिली. काही लोकांनी ३८ व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली होती, आम्ही वयाच्या साठीनंतर अशी भूमिका घेतली, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी १९७८ मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख केल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी याबाबत भाष्य करत अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
"जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात माझा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या ईडीवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे या प्रकरणात मी आता हायकोर्टात याचिका करणार असून अजित पवारांना सश्रम कारावास देण्यात यावा, अशी मागणी करणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी ते पुढील चार महिन्यांत तुरुंगात जातील," असा हल्लाबोल शालिनी पाटील यांनी केला आहे.
कोण मुख्यमंत्री होणार?
राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना शालिनी पाटील यांनी म्हटलं आहे की, "अजित पवार तर तुरुंगात जातील, त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही. एकनाथ शिंदेही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. कारण त्यांना शेतकऱ्यांसह इतर प्रश्न सोडवण्यात अपयश आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात. कारण त्यांनी त्यांच्या पक्षाचा विश्वासघात केला नाही," असं शालिनी पाटील म्हणाल्या.
अजित पवार आणि शरद पवारांच्या बंडात फरक
१९७८ मधील बंडाची आठवण करून देत अजित पवार यांनी आपल्या बंडाची तुलना शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेशी केली आहे. मात्र शालिनी पाटील यांना ही तुलना योग्य वाटत नाही. "या दोन्ही बंडांमध्ये फरक आहे. शरद पवार यांनी जे बंड केलं होतं ते त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी केलं होतं. मात्र आताचं अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी आहे. शरद पवारांवर मी याआधी टीका केली आहे. मात्र माझ्या पतीचं सरकार कोसळल्याने संतापातून मी टीका केली होती. शरद पवारांनी प्राप्त परिस्थितीनुसार ती भूमिका घेतली होती," अशा शब्दांत शालिनी पाटील यांनी शरद पवारांविषयी आता काहीशी मवाळ भूमिका घेतली आहे.