...अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाही; शिवसेना आमदाराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 03:05 PM2023-07-24T15:05:25+5:302023-07-24T15:07:05+5:30
शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीच्य सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदा अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना निधी वाटप केला आहे असं शिरसाट म्हणाले.
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते. त्यात राजकीय चर्चा नाही. मुख्यमंत्रिपद जाणार ही विरोधकांची अफवा आहे. मग कुठे अजित पवारांचे बॅनर लावायचे. तर कुठे माध्यमांना विधाने करायची. पण २०२४ पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहतील. मंत्री अनिल पाटील अथवा राष्ट्रवादी प्रवक्ते जे काही विधाने करतायेत त्यामुळे अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाहीत. अजित पवारांच्या अडचणीत वाढ होईल हे नक्की असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आमची बाजू मजबूत आहे. ज्यांची बाजू कमकुवत त्यांच्या मनात भीती असते. आम्ही वकिलांमार्फत सर्वकाही विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे आम्हाला भीती नाही. विधानसभा अध्यक्ष जो काही निर्णय घेतील हा त्यांचा अधिकार आहे. परंतु आमची बाजू भक्कम आहे. ती आम्ही कोर्टातही सिद्ध केली आहे असं त्यांनी सांगितले.
अजित पवारांना नाहक बदनाम केलं जातंय
शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीच्य सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदा अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना निधी वाटप केला आहे. अनेकांनी यावरे मते मांडली आहे. काहींना वाटते आमच्यावर अन्याय झाला असेल, काहींना वाटते भाजपावर अन्याय झाला असेल पण सर्वांनाच सारखा निधी वाटलेला आहे हे मी आर्वजून सांगतो. अजित पवारांना नाहक बदनाम केले जातेय. आमच्यावरही टीका केली जाते. ज्यांना निधी किती दिला याची माहिती नाही तेसुद्धा टीका करू लागलेत. अजित पवार यांनी निधीवाटपात मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनी ठरवलेल्या सूत्रानुसार निधी दिला आहे. सत्तेत असल्याने जो सत्तेत असतो त्यांना जास्त निधी दिला जातो. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही हेच घडले आहे. अजित पवारांनी निधी वाटप केले त्यात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीच्या सगळ्याच आमदारांना समान निधी दिलेला आहे. त्यामुळे निधी वाटपात कुठलीही नाराजी नाही असं प्रत्युत्तर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांना दिले आहे.
रोहित पवारांचे आंदोलन नौटंकी
अडीच वर्ष सरकार होते तेव्हा एमआयडीसीवर बोलता येत नाही का? विधानसभा अधिवेशन सुरू असताना अशाप्रकारे आंदोलन करणे ही नाटके आहेत. सरकारमध्ये काम करताना आमदाराने पाठपुरावा करणे गरजेचे असते. पाठपुरावा कमी पडला तर आपल्या मनात जी इच्छा असते ती पूर्ण होत नाही असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी आमदार रोहित पवारांना लगावला आहे.
टोलनाके फोडणे योग्य नाही
टोलनाक्यावर थांबवले असेल तर तुमची ओळख दाखवा. आम्ही देखील आमदार आहोत. टोलनाके फोडणे उचित नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही. सरकार आपल्यापद्धतीने कारवाई करेल अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाके फोडले त्यावर दिली आहे.