"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 02:27 PM2024-09-16T14:27:29+5:302024-09-16T14:30:35+5:30

Bacchu Kadu Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेते पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशात बच्चू कडू यांनी अजित पवार शरद पवारांकडे दिसतील, असा मोठा दावा केला आहे.

"Ajit Pawar will be With Sharad Pawar after few days"; Big statement of Bachu Kadu | "अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान

"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान

Bacchu Kadu News : विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत असल्याची कुजबूज सुरू आहे. याच दरम्यान, प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी एक मोठे विधान केले आहे. "अजित पवार यांचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार शरद पवार गटात जातील", असा दावा त्यांनी केला. 

अजित पवारशरद पवारांसोबत जातील, बच्चू कडूंनी केला मोठा दावा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मोठे विधान केले.

"आगामी काळात अजित पवार यांचे अर्ध्याहून अधिक आमदार हे शरद पवार गटात जातील. काही दिवसांनी अजित पवारही तिकडे दिसू शकतात. त्यांना कुणीही अडवलेले नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या पारड्यात जाऊन बसायचे आणि कुणाबरोबर राहायचे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे", असे बच्चू कडू म्हणाले. 

महायुती सरकारबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले, "तीन पक्षांचे सरकार आहे. श्रेयवादाची लढाई तर होणारच आहे. भाजप म्हणतेय की, लाडकी बहीण योजना आम्ही आणली. शिंदे गट म्हणतो आम्ही आणली आणि अजित पवारांचा पक्षही ती योजना आम्ही आणली असे म्हणत आहे. पण, योजना कुणी आणली हे त्यांनाच ठरवायचे आहे."

'लोकांनाही वाटतेय अजित पवार जाऊ शकतात', ओपिनियन पोलचा कौल काय?

काही दिवसांपूर्वी टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रीज (times now matrize opinion poll) ओपिनियचा पोल प्रसिद्ध झाला. या पोलमध्येही अजित पवारांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 'अजित पवार शरद पवारांसोबत जाऊ शकतात का?' असा प्रश्न होता. 

त्यावर 43 टक्के लोकांनी अजित पवार शरद पवारांसोबत जाऊ शकतात, असे मत नोंदवले, तर 33 टक्के लोकांनी जाणार नाही, असे म्हटले होते. 22 टक्के लोकांनी याबद्दल सांशक असल्याचे मत नोंदवले होते.   

राज ठाकरे सातत्याने करताहेत दावा

अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार, असे दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीपासून सातत्याने करत आहेत. अजित पवार सत्तेत सामील झाले. त्यांना शरद पवारांचा गटही येऊन मिळेल, असे ठाकरेंनी अनेकदा म्हटलेले आहे. अशात बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे या मुद्द्यावरील चर्चेला तोंड फुटले आहे.

Web Title: "Ajit Pawar will be With Sharad Pawar after few days"; Big statement of Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.