मुंबई – शरद पवार आणि अजित पवारांची भेट कौटुंबिक असल्याचे मला सांगण्यात आले. सुप्रिया सुळे यांच्याशी माझं बोलणंही झाले. मात्र पुढील निवडणूक बहुदा अजितदादांना भाजपाच्या तिकीटावर लढावे लागेल असा दावा राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अजितदादांच्या दिल्ली दौऱ्यावरूनही वडेट्टीवारांनी निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, अजित पवार नेहमी नाराज असतात, मनाप्रमाणे झाले तर खुश आणि मनाविरोधात झाले तर नाराज असते. हम करे सो कायदा असं त्यांचे आहे. तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे अशावेळी तुमच्या लोकांना निधी मिळत नाही अशी तक्रार आहे. तुम्ही धमक दाखवा, महाविकास आघाडीत धमक दाखवून तुम्ही सर्व तिजोरी साफ करत होता. आता ही धमक दादांनी सोडली. त्यामुळे निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा रडवण्याची हिंमत आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच दिल्लीचे चरणदास झालेले आता इकडे चरणदास आपली दादागिरी दाखवू शकणार नाही. दिल्लीला जाऊन तक्रार केली, तक्रार करता करता रडले वैगेरे सांगू नका. रडण्याची स्थिती अजित पवारांवर आली असावी. भाजपासोबत जाणाऱ्यांना रडवून रडवून सडवतात, आता रडण्याची आणि सडण्याची स्थिती अजित पवारांवर आली असावी असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना कमळावर लढल्याशिवाय पर्याय नाही हे मी खात्रीने सांगतोय. अजित पवार गटाला कमळाबाईची साथ असेच होणार आहे असंही त्यांनी सांगितले.
अजित पवार नाराज नाहीत – प्रफुल पटेल
अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. प्रफुल पटेल म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार अजिबात नाराज नाहीत. माध्यमात आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. दोन दिवसापूर्वी आम्ही दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली, यावेळी आम्ही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि सामान्य परिस्थितीवर चर्चा केली. कोणत्याही नाराजीचा विषयच नाही. तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. एकमेकांना विश्वासात घेऊन काम करत आहोत, वारंवार काहीजण अशा चुकीच्या बातम्या पसरवण्याचे काम करत आहे असा आरोप त्यांनी केला.