अजित पवार मोठी घोषणा करणार?; पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:44 PM2024-10-11T12:44:09+5:302024-10-11T12:45:24+5:30
मागील काही काळापासून अजित पवारांबाबत महायुतीत आलबेल नसल्याचं चित्र समोर येत आहे. आरएसएसनेही अजित पवारांमुळे महायुतीचं लोकसभेत नुकसान झालं असं म्हटलं होते.
मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांत होणार आहे. तत्पूर्वी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच अजित पवार मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीतून १० मिनिटांत बाहेर पडले अशा बातम्या माध्यमांत झळकल्या. त्यावरून विरोधकांनी विविध दावे केलेत. आता संध्याकाळी अजित पवार महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे अजित पवार काय भूमिका मांडतायेत याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज संध्याकाळी ६.३० वाजता माध्यमांशी बोलणार आहेत. या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉन्जमध्ये ही पत्रकार परिषद होईल. त्यामुळे या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार काय बोलणार याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांबाबत सातत्याने विविध बातम्या समोर येतायेत. त्यात महायुतीत अजित पवारांची कोंडी होत असल्याचा दावाही विरोधक करत आहेत.
महायुतीकडून अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यात भाजपा सर्वाधिक १५०-१६० जागा लढवण्यावर ठाम आहे तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनेही ८०-९० जागांवर दावा केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार हे निश्चित नाही. आम्हाला ६०-६५ जागा मिळाव्यात अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. परंतु अद्याप महायुतीचं जागावाटप निश्चित नाही. त्यातच शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. समीर भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळांनी त्यांना शुभेच्छा देताना नांदगाव मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिलेत. मात्र याठिकाणी शिंदे गटाचे सुहास कांदे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत काही आलबेल नाही असेच चित्र दिसून येत आहे.
"महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न"
दरम्यान, महायुतीच्या सरकारमधील कॅबिनेट बैठकीतील वाद रोजचेच झाले आहेत. हा वाद जनतेच्या हितासाठी नाही, तर स्वत:च्या हितासाठी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी हा वाद सुरू आहे. तिजोरित पैसा नसताना ८०-८० निर्णय घेतले जातात. यांना कोणाची चिंता आहे. अजित पवार यांना पूर्णपणे बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार अनेकवेळा वित्त खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी त्या विभागात शिस्त पाळण्याचे काम केलंय. पण, अलिकडे शिस्त बिघडवून काम सुरु आहे. आपल्या तिजोरीत पैसे किती आहेत आणि खर्च किती करावा याचं ताळमेळ नाही. पैसे नसताना जीआर काढले गेले, सगळं पाहता महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे हे दिसतंय, हे राज्याला कंगाल करुन सोडतील. जाता जाता जेवढं मिळेल तेवढे कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच अजितदादांनी काढता पाय घेतला असावा असा दावा काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.