शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:24 PM2023-07-15T12:24:49+5:302023-07-15T12:41:45+5:30
आज अजित पवार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिपदाच्या खातेवाटपावरुन सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू होते. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शपथविधीनंतर काल खातेवाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थ व नियोजन विभागाचा पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली. यानंतर आज अजित पवार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
नाशिकमध्ये अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मॉन्सूनचा पाऊस न पडल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले. तसेच, केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्याचा विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो असून आम्ही परिवार म्हणून काम करत आहोत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून राज्यातील प्रश्न सोडविता येणार आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. यांसदर्भात अजित पवार म्हणाले, "काकींवर शस्त्रक्रिया झाली. त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. त्यामुळे काकींना भेटण्यासाठी दुपारीच जायचे होते. पण विलंब लागला. विधानसभा अध्यक्षांना भेटायचे होते. त्यातच खाते वाटप झाले. त्यामुळे तिथे वेळ गेला. त्यानंतर काम झाल्यावर मी सुप्रियाला फोन केला. तिने सांगितले दादा आम्ही सिल्व्हर ओकवर चाललोय. तुझे काम झाल्यावर तिकडेच ये. म्हणून तिकडे गेलो".
याचबरोबर, "मला काकींना भेटायचं होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. आपल्या भारतीय संस्कृतीत कुटुंबाला महत्व देत असतो. सहाजिकचं आमच्या पवार कुटुंबियांनी आम्हाला हे शिकवलं आहे. त्यामुळं मी काकींना भेटलो. अर्धा तास भेटलो. तब्येतीची विचारपूस केली. त्यांना आणखी २१ दिवसांची विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सांगितलं आहे. माझ्या अंतर्मनाने सांगितलं म्हणून सिल्व्हर ओकवर गेलो. घरी शरद पवार साहेब होते. काकी होती, सुप्रिया तिथे होती."
दरम्यान, खातेवाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदी पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आज सकाळी लवकर अजित पवार यांनी नाशिक येथील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला. नाशिकमध्ये दाखल होताच त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण केला. अजित पवारांच्या स्वागत कार्यक्रमाच्यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.