राष्ट्रवादीत राहून अजित पवार कधीही मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत; शिवसेना नेत्याची शरद पवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:32 PM2023-06-05T12:32:57+5:302023-06-05T12:34:00+5:30
महाराष्ट्रात सगळीकडे भावी मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान यांचे बोर्ड लागू लागले आहेत.
महाराष्ट्रात सगळीकडे भावी मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान यांचे बोर्ड लागू लागले आहेत. यावर अजित पवार भावी मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न शिवसेना नेते विजय शिवतारे यांना विचारण्यात आला होता. यावर शिवतारे यांनी अजित पवार राष्ट्रवादीत राहून कधीही मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत, असे म्हटले आहे.
सगळे प्रकल्प बारामतीला नेले. एकट्या बारामती मतदारसंघाच्या जोरावर ब्लॅकमेलिंग करण्याचे काम सुरु आहे. १९७८ ला शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन केले होते. दोन वर्षे नाही होत तोच पुन्हा निवडणूक लागली. त्यांना पाठिंबा देणाऱ्या जनता दलाचे १०३ आमदार असलेले सातवर आले. त्यांनी कितीही आपटूद्या, महाराष्ट्राच्या जनतेच्या दोन चार जिल्ह्यांतील फायनान्स त्यांच्याकडे आहे. पवारांच्या हातात कारखाने आहेत, दूध डेअऱ्या, सहकारी बँका आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पायाखाली ठेचून ठेवल्याने त्यांचे साठ सत्तर आमदार निवडून येतात, अशी टीका शिवतारे यांनी केली.
शरद पवार यांना कधीही महाराष्ट्राच्या जनतेने विश्वासाने सत्ता दिलेली नाही. शरद पवारांच्या विचाराला दोन चार नगरसेवक मिळत नाहीत. जिथे सुशिक्षित मतदार आहे तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येत नाहीत. यामुळे कोणी किती भावी भावी लावावे, काही फरक पडत नाही, असे शिवतारे म्हणाले.
अजित पवार राष्ट्रवादीत राहिले तर मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. त्यांच्याकडे स्पष्टवक्तेपणा आहे, चिटिंग करत नाहीत, म्हणून मी त्यांना निमंत्रण दिले होते, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.