अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 11:59 PM2024-10-03T23:59:16+5:302024-10-04T00:04:50+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीयांचं होमग्राऊंड असलेल्या बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे आमने सामने आले होते. अजित पवार गटकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्यामध्ये झालेल्या त्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत बारामतीकर काय कौल देणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
बारामतीकरांना भावनिक आवाहन करताना अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत समोरच्या गटाकडे बुथवर ठेवण्यासाठीही माणसं नव्हती. मात्र त्या निवडणुकीत काय झालं, याचा मी बारकाईने विचार केला आहे. आता विधानसभा निवडणुकीत मी जो उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून आणायचं आहे. आता हा आमदार कसा निवडून द्यायचा हे तुम्ही ठरवायचं आहे, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. अजित पवार यांच्या या आवाहनानंतर अजित पवार यांचे समर्थक असलेले कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आले.
दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीमधून माघार घेतल्यास येथून अजित पवार यांच्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाईल, याबाबत उत्सुकता आहे. त्यात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि आणि जय पवार यांची नावं चर्चेत आहेत. त्यातही जय पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून येथे युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे बारामती विधानसभेतही पवार विरुद्ध पवार अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत.