मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं राज्यपाल रमेश बैस यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 04:51 PM2023-04-20T16:51:45+5:302023-04-20T16:52:19+5:30

सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या घटनेला आणि मृत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे असं अजित पवारांनी म्हटलं.

Ajit Pawar wrote a letter to the Governor regarding the Incident at Maharashtra bhushan Award Ceremony, demanding to file a case of culpable homicide. | मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं राज्यपाल रमेश बैस यांना पत्र

मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं राज्यपाल रमेश बैस यांना पत्र

googlenewsNext

मुंबई - खारघरच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला झालेल्या दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी अजित पवारांनी पत्राद्वारे केली आहे. नुकतेच काँग्रेसनेही राज्यपालांना या घटनेबाबत विशेष अधिवेशन बोलावून निष्काळजीपणा केलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रात म्हटलंय की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेत १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. मी स्वत: घटनेच्या दिवशीच रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या गंभीर घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी. या दुघर्टनेबाबत वेगवेगळी माहिती सोशल मीडियातून समोर येतेय. कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली व त्यात अनुयायांचा मृत्यू झाला. उपस्थितांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. ७ तास ते पाण्याशिवाय व अन्नाशिवाय होते. त्यामुळे अनेकांना उन्हाचा त्रास झाला. गर्दीचे योग्य नियोजन न केल्याने रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहचण्यास विलंब झाला. त्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट असताना उघड्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी निवडण्यात आलेल्या कंपनीला अशा भव्य कार्यक्रम आयोजन करण्याचा अनुभव नव्हता. जाहीर करण्यात आलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा अधिक अनुयायांचा मृत्यू झालाय असं समोर येत आहे. त्यामुळे सर्व बाबींचा शहानिशा करून त्यामधील सत्य जनतेसमोर येणे अत्यंत गरजेचे आहे असं पत्रात म्हटलं आहे. 

तसेच हा शासकीय कार्यक्रम असल्याने शासनाकडून त्यासाठी तब्बल १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. राज्यात उष्णतेची लाट असताना एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सर्व शक्यतांची पडताळणी शासनाकडून होण्याची आवश्यकता होती. तथापि, ती न झाल्याने १४ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना नैसर्गिक नसून शासननिर्मित आहे. सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या घटनेला आणि मृत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि या कार्यक्रमाच्या नियोजनाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत घ्यावी, जखमी अनुयायांना प्रत्येकी ५ लाख रुपये मिळावे अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. 

दरम्यान, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, मी या मागणीचे पत्र १७ एप्रिलला सरकारला दिले आहे. मात्र एकाही मागणीबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही. सरकारचे प्रमुख म्हणून या मागण्या मान्य करण्याबाबत आपण सरकारला निर्देश द्यावेत अशी मी राज्यातील जनतेमार्फत विनंती करतोय असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रातून राज्यपालांना केली आहे. 

Web Title: Ajit Pawar wrote a letter to the Governor regarding the Incident at Maharashtra bhushan Award Ceremony, demanding to file a case of culpable homicide.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.