ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२१ - सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज लाचलुचपतप्रतिबंधक खात्याच्या समोर हजर झाले. त्यांची तब्बल सहा तास कसून चौकशी झाली, चौकशी दरम्यान त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाची त्यांनी उत्तरे दिली पण ती पुरेशी नसल्यामुळे चौकशीसाठी त्यांना पुन्हा हजर रहावे लागणार आहे. कोंढाणे धरण प्रकरणी काल तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची तब्बल साडे तीन तास चौकशी करण्यात आली. सुनील तटकरे आणि अजित पवार यांना एकाच दिवशी समन्स देण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारही एसीबीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली.
केवळ चौकशी सुरु आहे, यातून सत्य बाहेर येईल, चौकशी झाली म्हणजे आरोप सिध्द झाले असे होत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
कोंडणे प्रकल्पात ६१४ कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार अंजली दमानिया यांनी एसीबीकडे केली होती. त्यानंतर तत्कालीन कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष सुनील तटकरे आणि तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. कोंडणे प्रकल्पाला २२ जुलै २०११ साली मंजुरी मिळाली होती. तर २०१४ च्या ऑक्टोबरपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अतिरिक्त निधीचा गैरव्यवहार करून हा प्रकल्प २०१३ साली पूर्ण करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता.