ठाणे : कोकणातील बाळगंगा प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीला माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांनीही दांडी मारली. नियोजित गणेशोत्सव भेटींच्या कार्यक्रमाचे कारण पुढे करून मंगळवारी ते या चौकशीस अनुपस्थित राहिले. मात्र त्यांच्यावतीने तीन प्रतिनिधींनी चौकशीला हजेरी लावली. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही गणेशोत्सवानंतर तारीख द्यावी, अशी विनंती करीत सोमवारी झालेल्या चौकशीला गैरहजेरी नोंदविली.कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत बाळगंगा प्रकल्पातील निविदा प्रक्रिया व इतर अनुषंगिक कार्यवाहीतील गैरव्यवहाराबाबत ठाणे लाचलुचपत विभाग ही चौकशी करीत आहे. विशेष चौकशी पथकांमार्फत तपास चालू असून या तपासामध्ये मंंगळवारी अजित पवार यांना स्वत: अथवा त्यांच्या प्रतिनिधींना चौकशीकरिता हजर राहण्यास एसीबीने सांगितले होते. मात्र पवारांनी नियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहता येत नसल्याचे कळविले. मात्र त्यांचे प्रतिनिधी म्हणून सुनील मुसळे, अॅड़ कार्लोस आणि अॅड़ मालवणकर यांनी हजेरी लावल्याचे एसीबीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
अजित पवारही चौकशीला अनुपस्थित
By admin | Published: September 23, 2015 1:41 AM