माझ्या जीवात जीव असेपर्यंत...; अजित पवार यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 03:26 PM2023-07-05T15:26:37+5:302023-07-05T15:27:11+5:30
मी कुणाचाही अपमान केला नाही. अनेकदा मी माघार घेतली. अनेकदा कमीपणा घेतला असं अजित पवार म्हणाले.
मुंबई – कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम दिले. माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुम्हाला अंतर देणार नाही. मी इथून पुढच्या काळात राज्यभरात फिरेन, माझी भूमिका सांगण्याचा प्रयत्न करेन. २०२४, २०२९ ची निवडणूक असेल नवीन कार्यकर्ते पुढे आणायचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत टीम आपल्याला पुढे आणायची आहे. नुसते भाषणात सांगून नाही तर कृतीत काम करायचा आहे. अजित पवार कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या. त्या आशीर्वादाला मी निश्चित जागेन अशी साद अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ४-५ वेळा उपमुख्यमंत्री झालो रेकॉर्ड झाला पण पुढेच जात नाही. मी प्रमुख व्हावे मनापासून वाटते. माझ्या मनात काही गोष्ट आहे त्या गोष्टी राबवावं. पक्ष, चिन्ह आपल्याकडेच ठेवायचा आहे. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आणू. महाराष्ट्र पिंजून काढू. पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरू. आमच्या दैवताने आम्हाला आशीर्वाद द्यावा. मलाही भाषण करता येते. उद्या त्यांनी दौरा सुरू केला तर मलाही उत्तर द्यावे लागेल. माझ्यात खोट नाही. तू निवडून कसा येतो अशी भाषा वरिष्ठांनी करायची. तुमची मुले ना ती, तुम्ही दैवत आमचे. पण असं बोलता. आम्ही जे करतोय ते राज्याच्या भल्यासाठी करतोय. कोट्यवधीचा निधी मतदारसंघाला आणता येईल असं त्यांनी सांगितले.
तसेच मी कुणाचाही अपमान केला नाही. अनेकदा मी माघार घेतली. अनेकदा कमीपणा घेतला. आमच्यावर गुगली टाकली ती सहन केली. सांगितले एक आणि केले दुसरे. मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे. आपणच आपल्या कार्यकर्त्यांना घरच्या माणसांना कशापद्धतीने खेळवायचे. बदनाम करायचे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोकांनी मला व्हिलन केले. मला जे सांगितले ते केले. परकीय मुद्दा निघाला ६ महिन्यात बासनात गुंडाळून ठेवले. त्यानंतर त्यांच्यासोबतच आपण आलो असंही अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, आपल्याला मंत्रिमंडळात आणखी संधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ मंत्रिपदे दिली त्यात ओबीसी, अल्पसंख्याक, महिला सगळ्यांना संधी दिली. आजही माझ्या जीवाभावाचे सहकारी आहेत. महामंडळे आहेत. राज्यमंत्रिपदे मिळणार आहेत. मी रात्रंदिवस काम करेन. भाजपा-शिवसेना आमदारही नाराज होतील अशी कामे करणार नाही. आपल्याही आमदारांनाही न्याय देईन. मागील काही वर्ष आमदारांच्या मतदारसंघात ब्लॅकलॉग पडलाय तो भरून देईन हा शब्द देतो असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.
जितेंद्र आव्हाडांना नाव न घेता टोला
ठाण्याचा पट्टा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, सुभाष भोईर, किसन कथोरे, संदीप नाईक, निरंजन डावखरे यासारखे अनेकजण पक्ष सोडून गेले. एका मंत्र्यांनी ४ आमदार निवडून आणले पाहिजे. बेरजेचे राजकारण केले पाहिजे. पण आपले आमदार घालवणाऱ्याला नेता बनवला. काही प्रवक्ते चांगल्याचे वाटोळे करतात. तसले काम ती व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.