'तुम्ही आम्हाला ८ जागा दिल्यात, आता उपमुख्यमंत्री असेपर्यंत काहीही कमी पडू देणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:06 PM2020-03-09T15:06:49+5:302020-03-09T16:19:39+5:30
रोहित पवार यांना तुम्ही निवडून दिले आहे. तुमचं काम झालं, आता आमची जबाबदारी आहे.
मुंबई - नगर जिल्ह्याने बारा पैकी 9 जागा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाला निवडून दिल्या. यामध्ये प्राजक्त तनपुरे आणि शंकरराव गडाख मंत्री झालेत. याच जिल्ह्यातून रोहित पवारांना कर्जत जामखेडच्या मतदारांनी विजयी केले. पण याच नगर जिल्ह्यातून अनेकजन उमेदवारी घेण्यास मागे सरकत होते. आमचा मुलगा रोहित पवार यांच्यासारखे धाडसाने निवडणुकीत उभारायच असतं, असं अजित पवार यांनी म्हटले.
रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून माजीमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. रोहित यांच्या विजयानंतर अजित पवार प्रथमच कर्जत-जामखेड मंतदार संघात आले होते. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या काळातील उमेदवारी निश्चित करतानाच्या आठवणी सांगितल्या. महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
रोहित पवार यांना तुम्ही निवडून दिले आहे. तुमचं काम झालं, आता आमची जबाबदारी आहे. नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही 8 जागांवर निवडून दिले. तसेच आम्ही पाठिंबा दर्शविलेले शंकरराव गडाख यांनाही तुम्ही विजयी केले. त्यामुळे उपमुख्यमंत्री असेपर्यंत नगर जिल्ह्याला काहीही कमी पडू देणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी दिला.
श्रीगोंदा येथून घनश्याम शेलार यांची उमेदवारी उशिरा जाहीर केली. ते एक महिनाआगोदर कामाला लागले असते तर तेही आमदार झाले असते. मात्र आमच्या राहुल जगताप यांच होय-नाही सुरू होतं. प्राजक्त तनपुरे देखील पण असच म्हणत होता, दादा उभं राहु का, की मागं राहू. अरे धाडसाने उभं राहायच असतं. आमचा मुलगा रोहित कसा पुणे जिल्ह्यातून आला आणि येथून विजयी झाला. हे धाडस खरं असल्याचं अजित पवार म्हणाले.